अवकाळी पावसाच्या भीतीने राजाळेत गहू काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदल; रब्बी हंगामातील काढणी अंतिम टप्प्यात


राजाळे (ता. फलटण) परिसरासह तालुक्यात अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांची उर्वरित गहू काढणीसाठी मोठी धावपळ सुरू झाली आहे. यंदा गव्हाचे पीक चांगले आले असले तरी, पावसाच्या भीतीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.

स्थैर्य, राजाळे, दि. २ एप्रिल : फलटण तालुक्यासह राजाळे व परिसरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे, उर्वरित गहू सुरक्षितपणे काढून घेण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तालुक्यातील रब्बी हंगामातील गव्हाची काढणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

रब्बी हंगामाचा ‘राजा’ म्हणून गव्हाचे पीक तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा गव्हाला अतिशय अनुकूल वातावरण मिळाल्याने पीक चांगले आले असून, उत्पादनातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चांगले पीक आल्याने शेतकरी वर्गात सुरुवातीला समाधानाचे वातावरण होते. मात्र, गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे काही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

परिणामी, हातातोंडाशी आलेला घास पुन्हा अवकाळीच्या तडाख्यात सापडू नये, यासाठी उर्वरित गहू तातडीने काढून घेण्यासाठी शेतकरी वर्गात मोठी गडबड आणि घाई सुरू आहे.

एकूणच, या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील गहू उत्पादक पट्ट्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवस हवामान असेच राहिल्यास नुकसानीचा आकडा वाढण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतीचे अधिक नुकसान टाळण्यासाठी पावसाने आता विश्रांती घ्यावी, अशीच प्रार्थना सध्या बळीराजा करत आहे.


Back to top button
Don`t copy text!