
दैनिक स्थैर्य । दि.२४ मार्च २०२२ । जावली । पिसाडी (कारगाव) ता. जावली येथील शेतकरी रानगव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कारगाव ग्रामपंचायत हद्दीतील पिसाडी गावचे हद्दीत लक्ष्मण बाबुराव माने वय ६० वर्षे हे सकाळी साडेनऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपली गुरे चरायला सोडण्यासाठी डोळेझाक शिवारात गेले होते. याच शिवारात त्यांची स्वतः ची वावरे असून त्या ठिकाणी त्यांनी जोंधळा या पिकाची शेती केली आहे. गुरे चरायला सोडून परतत असताना जोंधळा केलेल्या वावरानजीक माने आल्यावर रानगव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. वयोवृद्ध माने हे रानगव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने पूर्णपणे रक्तबंबाळ झाले. माने यांनी आरडाओरडा करताच गावातील ग्रामस्थ डोळेझाक शिवाराच्या दिशेने धावून गेले तोवर कालवा झाल्याने रानगवा पळून गेला. त्यानंतर तेथील ग्रामस्थांनी माने यांना डालग्यातून पिसाडी येथून डोंगरातून पायवाटेने कात्रेवाडी वरून जळकेवाडी इथपर्यंत आणले. जळकेवाडी येथे आल्यावर खाजगी वाहनांची सोय करून त्यांना अधिक उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, प्रकृतीत थोडीफार सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. बामणोली वन्यजीव कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची टीम घटनास्थळी पोहचली असून पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, वन्य प्राण्यांचे असे हल्ले कात्रेवाडी, पिसाडी, कारगाव, आंबवडे या गावातील लोकांनी किती दिवस सहन करायचे ? असा देखील सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. कधी अस्वल, रानगवे मनुष्य प्राण्यावर तर कधी बिबटे पाळीव जनावरांवर वारंवार हल्ले करण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, प्रशासन या वस्त्याबाबत आजवर कोणताही ठोस निर्णय घेताना दिसत नाही. तरी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातून या लोकांची मुक्तता करायची असेल तर शासनाने वेळीच लक्ष घालून याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आता कारगाव ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांकडून होत आहे.