
दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२१ । फलटण । अवकाळी पाऊस आणि बदलते हवामान यामुळे शेतातील उभ्या पिकांकडे पाहुन शेतकरी अक्षरशः धास्तावला आहे. अगोदर कोरोना कालावधीत बाजार पेठ व योग्य दर न मिळाल्याने आर्थिक संकटात असलेला शेतकरी पिके जोमदार असताना वीज वितरण कंपनीने कोणतीही पूर्व सूचना न देता वीज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावल्याने पिके जोमात आहेत, विहिरीत पाणी आहे पण वीज पुरवठा खंडित झाल्याने पिके हातची जाणार या भीतीने बळीराजा धास्तावला आहे, तशातच अवकाळीचे संकट उभे राहिल्याने शेतकरी पूर्ण कोलमडून पडणार आहे, अशावेळी शासनाने त्याला आधार देण्याची गरज आहे.
फलटण तालुक्यात सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे पीक उभे असून अजून लहान असल्याने पावसाचा फार परिणाम झाला नाही तरी हवामान बदलामुळे पिकाची वाढ खुंटणे, माव्याचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे, हरभरा, मका, सोयाबीन सारखी पिके चांगली आहेत मात्र पाऊस व हवामानाचा या पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
फलटण तालुक्यात सुमारे ९०० हेक्टर क्षेत्रावर डाळिंब बागा उभ्या आहेत, त्यापैकी बहार धरलेल्या सुमारे २०० ते २५० हेक्टर क्षेत्रावरील डाळिंबाना पाऊस व बदलत्या हवामानाचा फटका बसण्याचा धोका असल्याने बळीराजा या परिस्थितीतही सतत औषध फवारणी करुन आपल्या बागा वाचविण्यासाठी अहोरात्र झगडत आहे, तीच स्थिती द्राक्ष बागांची आहे, तालुक्यात ४०/५० हेक्टर द्राक्ष बागा आहेत त्यापैकी बहार धरलेल्या २०/२५ हेक्टर क्षेत्रावरील शेतकरी संतत धार पाऊस आणि प्रचंड थंडीतही या बागांमध्ये थांबून वरचेवर औषध फवारणी आणि निरीक्षण करुन बाग वाचविण्यासाठी धडपडताना दिसतो आहे.
तालुक्यात सुमारे २ हजार हेक्टर क्षेत्रावर हळवा व गरवा कांदा पीक जोमदार आहे, सध्या कांद्याला दर समाधान कारक आहेत मात्र पावसाने तयार झालेला किंवा तयार होण्याच्या स्थितीत असलेला सुमारे २०० ते २५० हेक्टर क्षेत्रावरील कांदा पावसात काढता न आल्याने शेतात सडून, कुजून जाण्याचा धोका आहे तर उर्वरित क्षेत्रावरील कांदा पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याचा तसेच मावा व तत्सम रोगराईचा धोका असल्याने कांदा उत्पादक शेतकरी घाबरुन गेला आहे.
भाजीपाला, टोमॅटो व अन्य पिके क्षेत्र कमी असले तरी त्याचे नुकसान त्या छोट्या शेतकऱ्यांना न सोसणारे असल्याने एकूणच शेती व शेतकऱ्यांना शासनाने भरीव आर्थिक मदत करण्याची नितांत आवश्यकता आहे.
फलटण तालुक्यात सुमारे १७ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाचे तुटणारे क्षेत्र असून नेहमी दसऱ्याच्या दरम्यान सुरु होणारे साखर कारखान्यांचे गळीत हंगाम यावर्षी दिवाळी नंतर सुरु झाल्याने आणि अजूनही पावसाच्या सततच्या वर्षावाने ऊस तोडणी वाहतूक खोळंबत असल्याने तालुक्यातील चार ही कारखान्यांना पुरेशा प्रमाणात ऊस पुरवठा होत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
संतत धार पावसाने ऊस तोडणी वाहतूक रखडत आहे, परिणामी दुसऱ्या जिल्ह्यातून या कामासाठी आलेले तोडणी वाहतुक मजुरांच्या झोपड्यात पाणी शिरल्याने त्यांचा निवारा उध्वस्त झाल्याने त्यांना गावातील प्रा. शाळा, मंदिराचा आसरा घ्यावा लागत आहे, मात्र काम नसल्याने हातावर पोट असणाऱ्या या मजुरांवर जादा उचली घेऊन गुजराण करण्याची वेळ आली आहे, त्यातच निवारा हिरावला गेल्याने थंडी व पावसात लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाला थंडीत कुडकुडत दिवस काढावे लागत आहेत तर नेहमीच्या शेत मजुरांनाही पावसामुळे शेतातील कामे बंद असल्याने प्रसंगी उपासमारीचा सामना करावा लागणार आहे.
फलटण तालुक्यातील पावसाची वार्षिक सरासरी ४००/४५० मि. मी. इतकी अल्प असून यावर्षी आतापर्यंत ३४७.५ मि. मी. पाऊस झाला आहे. आज गुरुवार दि. २ रोजी सकाळी संपलेल्या २४ तासात फलटण येथे ६४.३ मि. मी., आसू ५७ मि. मी., होळ ७१ मि. मी., गिरवी ६८ मि. मी., आदरकी ८७ मि. मी., वाठार निंबाळकर ६० मि. मी., बरड ६४.८ मि. मी., राजाळे ७०.८ मि. मी., तरडगाव ७६.८ मि. मी. पावसाची नोंद स्वयंचलीत पर्जन्य मापकावर झाली आहे.