स्थैर्य, फलटण : १ जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून फलटण कृषी पदवीधर संघटना विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील सांगवी गावात संघटनेतर्फे ऊस या पिकावरती ‘शेतकऱ्यांची शेतीशाळा ‘ व विविध शेतीपर विषयांवरचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे व राज्य शासनाने कृषी संजीवनी सप्ताह शेतकरी बांधवांचा उन्नती करता आयोजित केला आहे. या सप्ताहात कृषी पदवीधर संघटनेने राज्यभर सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष महेश कडूस-पाटील यांना कृषी मंत्र्यांनी पत्राद्वारे केले होते. त्या नंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील कृषी पदवीधर संघटना स्वयंसेवक तसेच पदाधिकारी कृषी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
फलटण तालुक्यातील सांगवी गावात केलेल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. गारकर तसेच मंडलाधिकारी अमोल सपकाळ उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये कृषी पर्यवेक्षक पालवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात संघटनेची माहिती देवून झाली व प्रस्तावना ओंकार गोडसे यांनी केली.
हा कार्यक्रम सातारा जिल्हाध्यक्ष नितीन निंबाळकर, पश्र्चिम महाराष्ट्र सचिव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ठ रित्या पार पडला. ह्या कार्यक्रमात फलटण तालुका विद्यार्थी तालुकाध्यक्ष ओंकार गोडसे, कार्याध्यक्ष सूरज जाधव, सचिव – वैभव फडतरे, अनिकेत काकडे, अंकुश गटकुल, विद्यार्थी संघटक निखिल माळवे, सुयश शिंदे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना ऊस या पिका बद्दल जास्तीत जास्त माहिती मिळावी. तसेच त्यांना विविध माहिती संघटने मार्फत मिळावी. या कार्यक्रमाला शेतकरी बांधवांचा देखील सहभाग घेतला होता. या पुढे आठवडाभर असे कार्यक्रम करून, कृषी संजीवनी सप्ताहात आपली संघटना सहभागी राहणार असल्याचे तालुकाध्यक्ष ओंकार गोडसे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आभार सूरज जाधव यांनी मानले.