खोटारड्या ठाकरेसरकारमुळे शेतकऱ्याची दिवाळी काळी! आश्वासनांची आतषबाजी करून शेतकऱ्याची फसवणूक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२१ | सातारा | ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरेद्यावीत, अन्यथा जनतेचीव शेतकऱ्याची फसवणूक केल्या प्रकरणी सपशेल माफी मागावी, अशी मागणी भाजपा किसान मोर्च्या प्रदेशाध्यक्ष मा.श्री वासुदेव काळे . यांनी पत्रकार परिषदेत केली.

राज्यातील ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनीं वरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे.प्रत्यक्षात १०० लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत, आणि पुरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. जमिनींचा कस संपल्यामुळे पुढील दहा वर्षे तरी कोणत्याही पिकाची शाश्वती राहिलेली नाही, आणि ठाकरे सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्याची थट्टा करत आहे. जाहीर केलेल्या मदतीपैकी फुटकी कवडी देखील शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नसल्याने राज्यातील शेतकरी नैराश्यग्रस्त झाला असून आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने ठाकरे सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे. या दुःखामुळे हजारो शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात जाणार असून, मातोश्री, वर्षा आणि मंत्रालय मात्र रोषणाईने उजळणार आहे. ठाकरे सरकारला जरादेखील लाज असेल, तर यंदाची दिवाळी शेतकऱ्याच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीर करून मातोश्री व वर्षावर रोषणाई न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, असे ते म्हणाले.

गेल्या महिनाअखेरीपर्यंत शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या२८ लाख पूर्वसूचना दाखल केल्या होत्या. त्यामध्ये आता आणखी काही लाख सूचनांची भर पडली आहे. शेतकऱ्यास वाऱ्यावर सोडणार नाही, असे पोकळ आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांना दिलेल्या ९७३ कोटींच्या रकमेपैकी शेतकऱ्याच्या हातात फुटकी कवडी देखील पडलेली नाही, याची सरकारला शरम वाटत नाही का, असा सवालही त्यांनी केला.

सरकारी अधिकारी व दलालांनी संगनमत करून राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक चालविली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले असताना, या पिकाच्या मोठ्या उत्पन्नाचे आमीष दाखवून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची दिशाभूल केली. भेसळ युक्त खते, निकृष्ट बियाणे आणि फसवणुकीमुळे शेतकरी अगोदरच नागविला गेला असताना, अतिवृष्टीमुळे हातचे पीक वाया गेल्यावर मात्र ठाकरे सरकार मूग गिळून गप्प आहे, असा आरोप श्री वासुदेव काळे यांनी केला.सप्टेंबर महिन्यात क्विंटलला ११ हजारापर्यंत मिळणारा भाव आता चार ते पाच हजारां पर्यंत घसरल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्याने माल बाजारात आणणे थांबविल्याने आवकही थंडावली असून शेतकऱ्याच्या हाती पैसा नसल्याने दिवाळीअंधारात जाणार आहे.

ठाकरे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यास हेक्टरी फक्त दहा हजारांपर्यंतची मदत जाहीर करून शेतकऱ्याच्या नुकसानीचीही थट्टा केली.संकट काळात शेतकऱ्याला भुलवून खोटी आश्वासने देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याचा जबाब द्यायला हवा. केवळ पिकांचेच नव्हे, तर शेतजमिनींची धूप झाल्याने जमिनी नापीक झाल्या असल्याने, शेतकऱ्याच्या पुढच्या दहा वर्षांच्या उत्पन्नाचे मार्ग संपुष्टात आले आहेत. त्यामुळे जमिनीच्या मशागतीसाठी हेक्टरी ४० हजार रुपये अतिरिक्त मदत जाहीर करावी अशी मागणीही श्री. वासुदेव काळे यांनी केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याचे उत्पन साफ बुडाले असल्याने, संपूर्ण वर्षाकरिता वीजबील माफ केले पाहिजे, असे तेम्हणाले. संपूर्ण पिके नष्ट झालेली असताना पिकांचे पंचनामे योग्य रीतीने होत नसल्याने, तुटपुंजी मदत देखील शेतकऱ्यास मिळणार नाही, असेही ते म्हणाले. अतिवृष्टीमुळे कापसाचे पन्नास टक्क्यांहून जास्त पीक हातातून गेले असून बारा टक्क्यांहून अधिक ओलावा असल्याचे कारण देत खाजगी बाजारातील कापसाचे दर गडगडल्याने शेतकऱ्याला मोठा फटका सोसावा लागला आहे. आर्थिक अडचणीमुळे नाडलेल्या गरजू शेतकऱ्या कडील कापूस पडत्या भावाने विकत घेण्याची स्पर्धा सुरू झाली असून ठाकरे सरकारचे त्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने शेतकरी वाऱ्यावर पडला आहे, असे ते म्हणाले.

कोकण आणि विदर्भातील धानाच्या पिकाचीही प्रचंड हानी झाली आहे. ऊसाबाबत सरकारचे धोरण कारखानदारांच्या धार्जिणे असल्याने ऊस उत्पादकांनाही सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. चहूबाजूंना कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यासाठी सरकारच्या संवेदना मात्र संपल्या आहेत, संकटांनी वेढलेल्या सामान्य जनते साठी काहीह न करता केवळ सरकार स्थिर असल्याची निरर्थक व जनतेशी देणेघेणे नसलेले राजकारण करण्यात सरकारचे मंत्री गर्क आहेत. अमली पदार्थांच्या विरोधातील कारवाईच्या विरोधात मोहीम उघडणाऱ्या सरकारला शेतकऱ्याची दुःखे जाणून घेण्यात रस नसल्याने जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला आहे, अशी टीका श्री.वासुदेव काळे यांनी केली.

लखीमपूरच्या घटनेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोक व्यक्त करून महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीला राज्यातअतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या आणि नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी द्वेष का? संकटग्रस्त शेतकऱ्यास सहानुभूती दाखविणारा एक शब्दही मंत्रीमंडळाच्या बैठकीत का काढला जात नाही? असा सवालही त्यांनी केला.

या पत्रकार परिषदेला सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, किसान मोर्च्या प्रदेश चिटणीस रामकृष्ण वेताळ, जिल्हाध्यक्ष रामदास शिंदे,जिल्हा सरचिटणीस शंकर दडस, जिल्हा चिटणीस कोंडीबा आंबटकर ,सातारा तालुका अध्यक्ष हेमंत शिंदे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष जगन्नाथ भिलारे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार ,शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष मधुकर बिरामणे, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, सतरा तालुका सरचिटणीस गणेश पालखे, सातारा शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, तालुका उपाध्यक्ष जिजाबा कारंडे,सिनेकलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, भटके-विमुक्त आघाडी जिल्हा महिला अध्यक्ष प्रियाताई नाईक, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम बोराटे,ऍड सचिन तिरोडकर, माजी नगरसेवक किशोर पंडित, जिल्हा पदाधिकारी विजय गाढवे,राजेंद्र चव्हाण, किसान मोर्च्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!