वळसे येथे बिव्हीजीचा रस्ता बाधित शेतकर्‍यांनी खोदला जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी संतप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ जुन २०२१ । सातारा । वळसे (ता. सातारा) येथून बिव्हीजी फूड पार्ककडे जाणार्‍या रस्त्यासाठी जमिनी घेऊनही अद्याप त्याचे पैसे न मिळाल्याने संतप्त बाधित शेतकर्‍यांनी श रस्त्यावर चर मारून तो काही काळासाठी बंद केला.शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.जमिनीचे पैसे लवकरात लवकर मिळावेत अन्यथा हा रस्ता कायमस्वरूपी बंद करून वाहिवाटीस पुन्हा ताब्यात घेण्यात येईल असा इशारा शिवाजी राजाराम कदम, परशुराम विठोबा कदम, संतोष विठ्ठल कदम, नवनाथ विठ्ठल कदम व धनाजी विठ्ठल कादम या बाधित शेतकर्‍यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

बिव्हीजीच्या फूड पार्कसाठी जाणार्‍या रस्त्यासाठी वळसे (ता.सातारा) येथील काही शेतकर्‍यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या. वळसे येथून महादेव मंदिर मार्गे डोंगरातून हा रस्ता देगाव हद्दीत असलेल्या फूड पार्कसाठी तयारही करण्यात आला. त्यानंतर तीन वर्षांपासून या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे.

मात्र, या रस्त्यासाठी वळसे गावातल्या ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. त्यांना अद्यापही कोणताच मोबदला मिळाला नाही.या बाधित शेतकर्‍यांना देण्यासाठी शासनाने रक्कम संबंधित विभागाकडे दिली असल्याचे हे शेतकरी सांगतात. मात्र, अजूनपर्यंत केवळ कागदोपत्री भूसंपादन केले असून रस्ता तयार केला. त्याचे डांबरीकरणही केले. पण शेतकर्‍यांकडून संपादित केलेल्या जमिनीचे अद्यापही खरेदीखतच केले नसल्याचे त्यानी सांगितले.त्यामुळे तीन वर्षे ओलांडूनही त्यांना संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.

त्यामुळे शुक्रवारी येथील संतप्त बाधित शेतकर्‍यांनी त्यांच्या हद्दीतून जाणार्‍या रस्त्यावर ट्रॅक्टरने चर मारून काही काळासाठी हा रस्ता वहातुकीसाठी बंद करून एक प्रकारे इशाराच दिला. लवकरात लवकर संपादित जमिनीचे खरेदीखत करून व्याजासह संपूर्ण रक्कम मिळावी, अन्यथा कायमस्वरूपी हा रस्ता बंद करून जमीन पुन्हा वहिवटण्यासाठी ताब्यात घेणार असा इशारा यावेळी या शेतकर्‍यांनी दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!