अतिवृष्टीने शेतकरी खचला, पण दलाल मालामाल; फलटण तालुक्यातील दुग्ध उत्पादक आर्थिक चक्रव्यूहात

चाऱ्याचा तुटवडा, जनावरांचे आजार आणि औषधोपचाराचा अवाच्या सव्वा खर्च; दुधालाही मिळेना दर


स्थैर्य, गिरवी, दि. २८ सप्टेंबर : फलटण तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाचा आणि अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. ओला व सुका चारा मिळणे अशक्य झाल्याने, शेतकरी आपली जनावरे वाचवण्यासाठी मिळेल त्या पिकाचा मुरघास (सिलो) तयार करण्याच्या घाईगडबडीत लागला आहे. मात्र, याच परिस्थितीचा फायदा घेत मुरघास पुरवठादार, खाजगी पशुवैद्यक आणि औषध दुकानदार शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.

तालुक्यातील गिरवी, साखरवाडी, गोखळी, बरड, राजुरी, तरडगाव, सासवड, विडणी, पाडेगाव, कुरवली अशा अनेक गावांमध्ये शेतकरी मका, ऊस, गवत यांची मिळेल तशी कडबाकुट्टी करून मुरघास बॅगा भरण्यासाठी धडपडत आहे. मुरघास तयार करण्याचा खर्च वाढल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे.

एकीकडे चाऱ्याचा प्रश्न असताना, दुसरीकडे सततच्या पावसामुळे जनावरांचे गोठे ओले राहत आहेत. यामुळे गोचीड, माशा, डास यांचा प्रादुर्भाव वाढून जनावरांना ताप, लाळ गळणे, पुरळ येणे यांसारखे आजार पसरत आहेत. यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात कमालीची घट झाली आहे. आजारी जनावरांच्या उपचारासाठी खाजगी पशुवैद्यक अवाच्या सव्वा पैसे घेत असून, अनेक ठिकाणी पशुवैद्यक आणि मेडिकल दुकानदार संगनमताने शेतकऱ्यांची लूट करत असल्याच्या तक्रारी आहेत.

सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये मनुष्यबळ नसल्याने शेतकऱ्यांना खाजगी उपचारांशिवाय पर्याय उरलेला नाही. अशाप्रकारे शेतकरी चारा, पशुखाद्य, औषधोपचार आणि मजुरी यांच्या आर्थिक चक्रव्यूहात अडकला आहे. इतका खर्च करूनही दुध डेअरीकडून दुधाला चांगला दर मिळत नसल्याने, शेतकरी आर्थिकदृष्ट्या कंगाल आणि कर्जबाजारी होत आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर मात्र दलाल, ठेकेदार आणि कंपन्या मालामाल होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!