

स्थैर्य, सातारा, दि.१३ : अवकाळी पावसाचा फटका बसल्याने दसऱ्या पाठोपाठ दिवाळीत झेंडुच्या फुलांचे दर भडकले आहेत. शुक्रवारी साताऱ्यात झेंडुच्या फुलांना प्रतिकिलो दोनशे रुपयांचा दर आला होता. हा दर लक्ष्मीपुजनाच्या दिवशी दुप्पट होण्याची शक्यता फुलविक्रेत्यांनी वर्तवली आहे.
दसऱ्याची बाजारपेठ नजरेसमोर ठेवत अनेक शेतकऱ्यांनी झेंडुची लागण केली होती. झेंडुच्या फुलांचा बहर जोमात येत असतानाच जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने थैमान घातले. या पावसामुळे झेंडुच्या बागांसह इतर सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे दसऱ्याच्या आदल्या दिवशी झेंडुच्या फुलांचा दर 100 ते 150 किलो दरम्यान जावून पोहोचला होता. दसऱ्या दिवशी फुलांना 400 रूपये इतका विक्रमी दर साताऱ्यात मिळाला. दसऱ्यानंतर फुलांना लक्ष्मीपुजनादिवशी मोठी मागणी असते.
आज (शुक्रवार) साताऱ्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी झेंडुची फुले विक्रीसाठी आणली होती. सकाळच्या टप्प्यात फुलांचा दर प्रतिकिलो 200 रूपये किलोच्या घरात होता. फुलांची प्रत आणि आकारानुसार दरात फरक होता. लक्ष्मीपुजनादिवशी फुलांचा दर 400 ते 500 रुपयांच्या घरात पोचेल, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला. झेंडुच्या फुलांचे दर चढल्याने त्याचा परिणाम हाराच्या किंमतीवर सुध्दा झाल्याचे दिसून आले.

