जीआय टॅग स्ट्रॉबेरी’वरून शेतकरी आक्रमक

’महाबळेश्वर’च्या नावाखाली बाजारपेठेत विक्री; आंदोलनाचा इशारा


स्थैर्य, सातारा, दि. 5 डिसेंबर : महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला 1995 मध्ये जीआय मानांकन मिळाले आहे.महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला ’जीआय टॅग’ मिळून अनेक वर्षे झाली. या स्ट्रॉबेरीमध्ये असणारे गुणधर्म इतर तालुक्यात उत्पादित होणार्‍या स्ट्रॉबेरीपेक्षा वेगळे असून, तालुक्यात उत्पादित होणार्‍या स्ट्रॉबेरीची चव व गोडी वेगळी असल्याचे जाणवते. मात्र, काही तालुके व जिल्ह्यांत स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. त्यात उत्पादित होणार्‍या स्ट्रॉबेरीला सर्रास ’महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी’ असे नाव देऊन बाजारपेठेत विक्री होताना दिसत आहे. याविरोधात महाबळेश्वरमधील सर्व स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकर्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

’ऑल इंडिया स्ट्रॉबेरी ग्रो असोसिएशन’चे अध्यक्ष नितीन भिलारे यांच्या उपस्थितीत शेतकर्‍यांची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सांगितले, की महाबळेश्वरमध्ये उत्पादित होणारी स्ट्रॉबेरी अनेक वर्षांपासून या मातीमध्ये उगवली जाते व या मातीत असलेले गुणधर्म या स्ट्रॉबेरीमध्ये पाहावयास मिळतात, यामुळेच या स्ट्रॉबेरीला ’जीआय टॅग’ मिळाला आहे. मात्र, इतर तालुक्यांमध्ये हे पीक घेऊन हे उत्पादन ’महाबळेश्वर स्ट्रॉबेरी’ म्हणून बाजारपेठेत विक्री केले जात असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. ग्राहकांनी इतर तालुक्यात उत्पादित होणारी स्ट्रॉबेरी महाबळेश्वरची म्हणून खरेदी केली आणि तिची चव वेगळी लागली, तर ’महाबळेश्वर स्ट्रॉबेरी’चे नाव खराब होण्याची दाट शक्यता आहे.
मात्र, इतर तालुक्यांमध्ये होणारी कमी प्रतीची स्ट्रॉबेरी याच नावाने जावळीसह इतर तालुक्यात उत्पादित बाजारात विकली जाते. तिचा दर कमी असल्याने महाबळेश्वरच्या चांगल्या प्रतीच्या स्ट्रॉबेरीलाही कमी भाव मिळतो, याचा फटका येथील शेतकर्‍यांना बसत आहे. यामुळे असोसिएशनच्या स्ट्रॉबेरीसाठी क्यूआर कोड देऊन योग्य पद्धतीने मार्केटिंग करेल, जेणेकरून ती बाजारात महाबळेश्वरच्या नावानेच विकली जाईल.

तसेच, अलीकडच्या काळात काही कंपन्यांकडूनही दर पाडले जात असल्याने, त्यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी एक समिती तयार करण्याची मागणी त्यांनी केली, जेणेकरून . शेतकर्‍यांचे मोठे नुकसान टाळण्यासाठी आणि स्ट्रॉबेरी उत्पादकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सर्वांनी संघटित होण्याची गरज असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

या बैठकीत नितीन भिलारे यांच्यासह बाजार समितीचे अध्यक्ष राजेंद्र भिलारे, श्रीराम फळ प्रक्रियाचे अध्यक्ष गणपत पारठे, महाबळेश्वर फळे फुले सहकारी संस्थेचे अध्यक्ष किसन भिलारे, तसेच आनंदा भिलारे, विश्वनाथ भिलारे, शशिकांत भिलारे, विठ्ठल दुधाणे, प्रवीण भिलारे, संतोष आंब्राळे, रमेश चोरमले यांसह स्ट्रॉबेरी व्यापारी व स्विगी, ब्लिंकेट्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!