
स्थैर्य, 5 जानेवारी, सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय पुणे व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावर पर्यावरण पूरक उस व्यवस्थापन प्रकल्प व शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात झाली. यावेळी डॉ सुभाष ढाणे, माजी प्रक्षेत्र संचालक तथा विभाग प्रमुख, मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, डॉ. राजेंद्र सरकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व डॉ धर्मेद्रकुमार फाळके प्रकल्प समन्वयक तथा सहयोगी प्राध्यापक मृद विज्ञान विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कृषी धोरणाची तसेच बँकेच्या विविध अनुदान योजनांची माहिती डॉ. सरकाळे यांनी दिली. ऊसाचे उत्पादन वाढविण्याकरिता मातीचे अनन्य साधारण महत्व लक्षात घेऊन माती व पाणी परीक्षण करिता बँकेमार्फत अनुदान दिले जात आहे. त्याचप्रमाणे एआय टेक्नॉलॉजी मध्येही शेतकर्यांनी सहभाग घ्यावा याकरिताही अनुदान दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. ढाणे यांनी कृषी विद्यापीठामार्फत माती, पीक संवर्धन, रोग, सुधारित जाती याविषयी होत असलेल्या संशोधनाची माहिती दिली. शेतकर्यांनी कृषी विद्यापीठांनी सुचविलेल्या शिफारशीचा अवलंब करून आपले उत्पादन वाढविण्याकरिता प्रयत्न करावेत असे सांगितले.
डॉ. फाळके म्हणाले, कृषी महाविद्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अजिंक्यतारा कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक ऊस संवर्धन प्रकल्प हाती घेतला असून यामध्ये ज्या शेतकर्यानी सहभाग घेतला आहे त्यांच्या उत्पन्नामध्ये सरासरी 18 टक्के वाढ झाली असल्याचे सांगितले. ऊस पिकातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकरिता माती परीक्षण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ऊस तोडणीचे नियोजन करणे करिता आडसाली लागणीचे प्रमाण फक्त 20%, पूर्व हंगामीचे 30% ते 35%. सुरूचे 10% आणि खोडव्याचे 50% असे प्रमाण असणे आवश्यक आहे. अजिंक्यतारा कारखाना कार्यक्षेत्रात अडसाली ऊसाचे प्रमाण जास्त असून ते निश्चितपणे कमी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. याकरिता पूर्ण हंगामी व सुरु ऊस लागवडीस प्राधान्य देणेत यावे, यामुळे पिकाची फेर पालट होवून जमिनीची उत्पादकता वाढते. शेतकर्यांनी प्रमाणित नर्सरीमधुनच ऊसाची रोपे लागवडीसाठी वापरावीत. त्याचप्रमाणे सुपर केन नर्सरी तयार करावी, असे सांगीतले. खोडवा ऊस पिकाचे उत्पादन वाढविण्याकरिता शास्त्रीय पद्धतीने कसे संगोपन करावे याचे त्यांनी सादरीकरण केले. खोडवा पिकाकरिता आडसाली पेक्षा कमी खर्च येतो आणि कमी कालावधीमध्ये तो गळीतास जातो त्यामुळे खोडवा पीक आर्थिक दृष्ट्या किफायतशीर आहे. याकरिता जास्तीत जास्त खोडवा पिक ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन यशवंतराव साळुंखे यांनी कारखाना, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि कृषी महाविद्यालय यांच्यामार्फत घेतलेल्या संयुक्त पिक संवर्धन प्रकल्पाचा फायदा शेतकर्यांना झालेला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते म्हणाले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या सहकार्यामुळे कारखान्याची प्रगती होत असल्याचे सांगितले. शेतकर्यांच्या पीक वाढीसाठी, उत्पन्न वाढीसाठी तसेच माती परीक्षण आणि खोडवा ऊस व्यवस्थापन याकरिताच्या संचालक मंडळाच्या धोरणाची माहिती दिली. तसेच कारखाना शेतकर्यांच्या ऊसाचे वेळेत व योग्य पेमेंट अदा करीत आहे, तरी देखील शेतकरी इतर कारखान्यास ऊस पाठवित आहेत त्यामुळे कार्यक्षेत्रात ऊस असूनही गळिताचे दिवस कमी झाले व पर्यायाने कारखान्याचे गळीत कमी होत आहे. यामुळे कारखान्याचे आर्थिक गणित अडचणीचे होणार आहे. आपला कारखाना आर्थिक दृष्ट्या सक्षमपणे राहणे करिता जास्तीत जास्त गळीत होणे आवश्यक आहे. याकरिता कार्यक्षेत्रातील शेतकर्यांनी त्याचा संपूर्ण ऊस गळीतासाठी अजिंक्यतारा कारखान्यास पाठविण्याचे आवाहन केले.
कारखान्याचे संचालक विश्वास शेडगे यांनी स्वागत केले तर, कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव सावंत यांनी आभार मानले. कारखान्याचे लेबर ऑफिसर रणजित चव्हाण यानी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला कारखान्याचे सर्व संचालक, कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी विलास पाटील, सेक्रेटरी बशीर संदे, ऊस विकास विभागाचे कर्मचारी तसेच शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

