
स्थैर्य, फलटण, दि. ३० सप्टेंबर : सुरू असलेल्या दहिवडी-फलटण रस्त्याच्या कामादरम्यान, ठेकेदाराने शेतकऱ्याच्या हद्दीतील झाडे विनापरवाना आणि कोणताही मोबदला न देता तोडली असल्याचा गंभीर आरोप एका शेतकऱ्याने केला आहे. याबाबत झिरपवाडी येथील शेतकरी दत्तू लक्ष्मण काकडे यांनी फलटण वनविभागाकडे लेखी तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
शेतकरी दत्तू काकडे यांनी वनविभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्त्याला लागून असलेल्या त्यांच्या शेताच्या हद्दीतील झाडे शेतकऱ्याला विचारात न घेता ठेकेदाराने मनमानी पद्धतीने तोडली आहेत.
“गट नं. १३०/१ मधील एकूण ५ ते ६ झाडे बांधाच्या आतील बाजूने कापण्यात आली असून, ही झाडे शेतकऱ्याच्या मालकीची होती. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे,” असे निवेदनात नमूद केले आहे. या तोडलेल्या झाडांचा तातडीने मोबदला संबंधित शेतकऱ्याला मिळावा, अशी मागणी दत्तू काकडे यांनी केली आहे.