
दैनिक स्थैर्य । 28 मे 2025। सातारा । जांब (ता. खटाव) येथील शेरी नावाच्या शिवारात विजेच्या धक्क्याने शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. सोमनाथ संभाजी शिंदे (वय 40) असे मृत शेतकर्याचे नाव असून, शेतात त्यांच्या मालकीच्या विहिरीशेजारी काम करताना हा प्रकार घडला.
जांब येथे शेरी नावाच्या शिवारात सोमनाथ शिंदे यांच्या विहिरीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे काम ठप्प होते. रविवारी (ता. 25) सकाळी शेतात फिरून येतो, असे सांगून ते घराबाहेर पडले. ते सायंकाळ झाली तरी घरी परतले नाहीत. दिवसभर पाऊस सुरू असल्याने व त्यांचा फोनही लागत नसल्याने त्यांची आई उषा व पत्नी वनिता यांनी शेजारच्या शेतकर्यांकडे चौकशी केली. दरम्यान, शेतात विहिरीच्या बांधकामांचेआजूबाजूला पडलेले साहित्य गोळा करताना त्यांचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्यानंतर धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे चुलत भाऊ रणजित शिंदे यांना सोमनाथ हे विहिरीच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिस व महावितरणच्या कर्मचार्यांना घटनेची माहिती दिली.
घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण तपास करत आहेत.
सोमनाथ लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे शिवारातच बैलाने मारल्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या आई उषा यांनी दुःखातून सावरत संसार पुन्हा उभा केला होता. सोमनाथ यांनीही लहान वयापासून घरची जबाबदारी सांभाळली. त्यांनी शेतीत विविध प्रयोग करून कुटुंबाची प्रगती केली. त्यांचा गावच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातही सहभागहोता. त्यांच्या पत्नी वनिता सरपंच आहेत. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबासह गावावरही शोककळा पसरली आहे.