
स्थैर्य, सातारा, दि.25 ऑक्टोबर : ऐन दिवाळीच्या काळात महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट येथे गव्याच्या हल्ल्यात एका शेतकर्याचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की सोनाट (ता. महाबळेश्वर) येथील शेतकरी राघू जानू कदम हे गावाच्या वरच्या बाजूला असणार्या आपल्या शेतात नेहमीप्रमाणे निघाले होते. त्यांच्या शेतात भाताचे पीक काढण्याच्या स्थितीत आलेले आहे. त्यामुळे रोज सकाळी शेताकडे फेरफटका मारून वन्य प्राण्यांनी काही नुकसान केले की नाही, हे पाहण्याचा त्यांचा नित्यक्रम होता. आजही ते सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान शेताकडे एकटेच गेले होते. त्याचदरम्यान वाटेतच त्यांच्यावर गव्याने हल्ला चढवला. गव्याचे शिंग छातीत घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बराच वेळ शेताकडे गेलेले राघू कदम परत न आल्याने त्यांचा पुतण्या राजू कदम त्यांना पाहण्यासाठी शेताकडे गेला. त्यावेळी वाटेतच मळ्याचा खोर नावाच्या शिवारात त्यांचा मृतदेह दिसला. त्याने ग्रामस्थ व इतरांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर ग्रामस्थ तसेच शिवसेनेचे महाबळेश्वर तालुकाप्रमुख गणेश उतेकर यांना घटना समजल्यानंतर ते सर्व तिकडे पोहोचले. त्यानंतर वन विभाग व पोलिसांना कळविण्यात आले. रात्री सातच्या दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने सोनाट गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने शेतकर्यांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाल्याचे चित्र आहे.

