दैनिक स्थैर्य । दि. २१ जानेवारी २०२३ । मुंबई ।महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका तसेच वैशाली आणि पार्टी या कव्वालपार्टीच्या सर्वेसर्वा वैशाली शिंदे यांना मधुमेहामुळे स्वतःचा पाय गमवावा लागला असून सध्या के. ई. एम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, कलावंतांच्या पडत्या काळात त्याना आधार देण्यासाठी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र या संस्थेचे शिष्टमंडळ कार्याध्यक्ष भगवान साळवी, अध्यक्ष भार्गवदास जाधव, महासचिव राजाभाऊ तथा रामदास गमरे, उपाध्यक्षा मीनाक्षी ताई थोरात, सचिव मंदार कवाडे, माजी सचिव चंद्रमनी घाडगे, संघटक नरेश शिंदे, सुभाष सावंत, मोहन थोरात आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली वैशाली शिंदे यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.
सदर प्रसंगी कार्याध्यक्ष भगवान साळवी यांच्या सोबत महासचिव राजाभाऊ तथा रामदास गमरे, मंगेश जाधव, भाई जोशी आदी मान्यवरांनी वैशाली शिंदे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व संस्थेच्या वतीने आर्थिक धम्ममदत केली.
सम्यक कोकण कला संस्थेमार्फत नेहमीच कलावंतांच्या हिताचा विचार करून अनेक विधायक उपक्रम राबविले जातात त्यातीलच एक भाग म्हणजे आंबेडकरी चळवळीतील गरीब कलावंतांना त्यांच्या अडीनडीला मदतीचा हात पुढे करणे कारण आंबेडकरी कलावंत हे वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढत कोणताही व्यावसायिक किंवा आर्थिक दृष्टिकोन न ठेवता केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन बौद्ध धम्म, त्याची विचारधारा व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, क्रांतिसूर्य महात्मा फुले, माता सावित्री आदी महापुरुषांचे विचार आपल्या कलेतून सादर करीत असतात असे कलावंत पडत्या काळात उपेक्षित राहून नैराश्याच्या गर्तेत जाऊ नयेत म्हणून सम्यक कोकण कला संस्था नेहमीच त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहुन त्याना मदत करीत असते तोच वारसा जपत संस्थेच्या वतीने वैशाली शिंदे यांना मदत करण्यात आली असे प्रतिपादन मंदार कवाडे यांनी संस्थेच्या वतीने काढलेल्या परिपत्रकात केले आहे.