दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२१ | कराड | जुन्या पिढीतील बेकरी माल उत्पादक व कराडच्या प्रसिद्ध दिवेकर बेकरीचे मालक सीताराम परशुराम तथा अनिल दिवेकर (वय ७४) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. कराड जिमखानाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या अनिल दिवेकर यांनी अनेक विश्वस्त न्यास व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य केले आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
वडील परशुराम दिवेकर हे स्वातंत्र्य सैनिक व समाजसेवक असल्यामुळे अनिल दिवेकर यांच्यावरही तसे संस्कार झाले. त्यातूनच त्यांनी कराड जिमखाना ही संस्था सुरू करून आजवर शेकडो सामाजिक उपक्रम व कार्यक्रम राबवले. कराड येथे पार पडलेली साहित्य संमेलने, नाट्य संमेलन व रणजी ट्रॉफीचा क्रिकेट सामना याच्या नियोजनात अनिल दिवेकर अग्रस्थानी होते. बेकरी व्यवसायिकांच्या जिल्हा व राज्यस्तरावरील संघटनेचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष राहताना, त्यांनी आपल्या व्यवसायिक बांधवांचे प्रश्न सरकार दरबारी मार्गी लावले. गोव्याच्या नार्वे (डिचोली) येथील सप्तकोटेश्वर देवस्थानचे अध्यक्ष म्हणून काम पाहताना त्यांनी शासकीय निधीतून मंदिराचा जिर्णोध्दार केला. कराडची ग्रामदेवता कृष्णामाई उत्सव समितीचेही ते अध्यक्ष राहिले होते. येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मारक समितीचे ते सचिव होते.
मुळचे गोव्याचे असलेल्या अनिल दिवेकर यांचे आजोबा यशवंत दिवेकर यांनी १९३४ मध्ये येथील सोमवार पेठेत बेकरी व्यवसाय सुरू केला. तर, अनिल दिवेकर यांनी हा बेकरी व्यवसाय नावारूपाला आणला. मुंबईच्या दादर येथील केटरींग कॉलेजमध्ये बेकरी उत्पादनाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपल्या बेकरी व्यवसायात नव्या तंत्रज्ञानाचा सतत वापर केला. बेकरीच्या भट्टीसाठी लाकडे जाळली जात असल्याने पर्यावरणाची होणारी हानी गंभीर्याने घेऊन अनिल दिवेकर यांनी त्याकाळी प्रगत अशा डिझेल इंधनावरील ओव्हनचा वापर केला.