खुंटे येथे कौटुंबिक वाद; चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीसह सासू-सासऱ्यांना केली मारहाण


स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑगस्ट : खुंटे (ता. फलटण) येथे चारित्र्यावर संशय घेऊन पतीने आपल्या पत्नीसह सासू आणि सासऱ्यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पतीविरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही कौटुंबिक कारणास्तव आपल्या मुलांसह माहेरी, खुंटे येथे वास्तव्यास आहे. सोमवार, दि. ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास, तिचा पती घरी आला. ‘तू कंपनीतून कोणाच्या गाडीवरून आलीस,’ असे म्हणत त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला व तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.

पीडित महिलेचे वडील भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता, आरोपी पतीने त्यांना लाकडी दांडक्याने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सासूलाही त्याने त्याच दांडक्याने डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात सासू-सासरे दोघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

या झटापटीत पीडित महिलेच्या हातालाही दुखापत झाली आहे. आरडाओरडा ऐकून शेजारील नागरिक जमा झाल्यानंतर आरोपीने सर्वांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली व घटनास्थळावरून तो पसार झाला. यानंतर पीडित महिलेने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पती राम राजेंद्र कांबळे (रा. बांवधन, ता. वाई) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार अमोल पवार करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!