फलटणच्या ‘नारी सुवर्णा’ मेंढीची कीर्ती आफ्रिका खंडात; बुर्किना फासोचे शास्त्रज्ञ डॉ. ट्राओरे अभ्यासासाठी दाखल होणार


स्थैर्य, फलटण, दि. ५ ऑक्टोबर : येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेने (NARI) विकसित केलेल्या ‘नारी सुवर्णा’ या मेंढीच्या जातीची कीर्ती आता आफ्रिका खंडात पोहोचली आहे. या मेंढीच्या ‘जोड कोकरे’ देण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमतेचा अभ्यास करण्यासाठी पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो येथील पशुजेनशास्त्रज्ञ आणि संशोधक डॉ. अॅमदू ट्राओरे हे उद्या, दि. ६ ते १७ ऑक्टोबर दरम्यान फलटणच्या दौऱ्यावर येत आहेत.

ऑस्ट्रिया येथील आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने (IAEA) डॉ. ट्राओरे यांना या विशेष अभ्यास दौऱ्यासाठी पाठवले आहे. या भेटीदरम्यान, ते ‘नारी सुवर्णा’ पैदास कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेणार आहेत. यामध्ये जोड कोकरे होण्याच्या जनुकांची तपासणी, डीएनए विश्लेषण आणि गेल्या वीस वर्षांतील मेंढ्यांच्या नोंदींचा अभ्यास यांचा समावेश आहे. याकामी त्यांना पशुसंवर्धन विभागाच्या संचालिका डॉ. चंदा निंबकर, सहयोगी संचालक डॉ. प्रदीप घळसासी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञान सल्लागार पद्मजा घळसासी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

बुर्किना फासो या अविकसित देशात ‘नारी सुवर्णा’ सारखा पैदास कार्यक्रम प्रस्थापित करून मेंढ्यांच्या उत्पादनात सुधारणा करण्याच्या शक्यतेची चाचपणी करणे, हा डॉ. ट्राओरे यांच्या भेटीमागील मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणमध्ये प्रसिद्ध असलेली फलटणची ‘नारी सुवर्णा’ मेंढी आता आफ्रिकेपर्यंत पोहोचणार असल्याने संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.


Back to top button
Don`t copy text!