स्थैर्य, मुंबई, ९ : आजच्या व्यापारी सत्रात वित्तीय शेअर्सची घसरण झाल्यानंतर भारतीय बाजार निर्देशांकांत पडझड दिसून आली. निफ्टीने ११,३०० ची पातळी सोडली. तो ०.३५% किंवा ३९.३५ अंकांनी घटला व ११,२७८.०० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.४५% किंवा १७१.४३ अंकांनी घटला व ३८,१९३.९२ अंकांवर थांबला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात झी एंटरटेनमेंट (३.०६%), टाटा स्टील (३.५७%), रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (२.६८%), सिपला (२.७३%) आणि ग्रासिम इंडस्ट्रीज (२.३९%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर एसबीआय (४.०९%), गेल (३.३८%) बजाज फिनसर्व्ह (२.८९%), अॅक्सिस बँक (२.७३%) आणि आयओसी (२.६०%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.
बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे ०.२८% व ०.९४% नी घसरले. निफ्टी बँकेने २% ची घसरण घेतली तर निफ्टी आयटी व निफ्टी एफएमसीजीदेखील प्रत्येकी अर्ध्या टक्क्याने घटले.
झी एंटरटेनमेंट : ग्लोबल फायनान्शिअल फर्मने खरेदीचा निर्णय कायम ठेवत स्टॉकची टार्गेट किंमत २७५ रुपये प्रति शेअर ठेवली. त्यानंतर झी एंटरटेनमेंटचे स्टॉक्स ३.०६% नी वाढले व त्यांनी २२०.३० रुपयांवर व्यापार केला.
टाटा मोटर्स :एचएसबीसी या ग्लोबल फर्मने २०० रुपये प्रति शेअर ही किंमत कायम राखत खरेदीत स्टॉक अपग्रेड केले. त्यानंतर टाटा मोटर्सचे शेअर्स १.१६ टक्क्यांनी घसरले व त्यांनी १४०.६५ रुपयांवर व्यापार केला.
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज : कोव्हिड-१९ च्या रुग्णांवर उपचारासाठी कंपनीने ‘रेडिक्स’ या ब्रँड नावाखाली रेमडेसिव्हिर औषध लाँच करण्याची घोषणा केली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स १.६७% नी वाढले व त्यांनी ४,४२१.५० रुपयांवर व्यापार केला.
भारत डायनॅमिक्स : सरकार कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या १० टक्के स्टेक किंवा १८,३३८,१२५ इक्विटी शेअर्सची विक्री करेल, अशी माहिती कंपनीने दिल्यानंतर भारत डायनॅमिक्स कंपनीचे शेअर्स ५.१४ टक्क्यांनी घसरले व त्यांनी ३१४.०० रुपयांवर व्यापार केला.
रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड : रिलायन्स इंडस्ट्रिजचे स्टॉक २.६८% नी वधारले व त्यांनी २,१६३.५५ रुपयांवर व्यापार केला. खासगी इक्विटी जायंट सिल्व्हर लेक पार्टनर्सने १.७५% स्टेकसाठी कंपनीच्या रिटेल युनिटमध्ये ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केल्यानंतर हे परिणाम दिसले.
भारतीय रुपया : अस्थिर देशांतर्गत इक्विटी मार्केटमुळे भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७३.५३ रुपयांवर आला.
जागतिक बाजार : जागतिक आर्थिक सुधारणेसंबंधी वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आशियाई स्टॉक्सनी घसरण घेतली तरी युरोपियन स्टॉक्स हिरव्या रंगात स्थिरावले. नॅसडॅक, निक्केई २२५, हँगसेंगचे शेअर्स अनुक्रमे ४.११%, १.०४%, आणि ०.६३% नी घसरले. तर एफटीएसई १०० आणि एफटीएसई एमआयबीचे शेअर्स अनुक्रमे ०.७१% आणि ०.५०% नी वाढले.