
स्थैर्य, सातारा, दि. 19 नोव्हेंबर : उत्तर खटाव तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या पुसेगाव बाजारपेठेत गेल्या महिनाभरापासून पन्नास व शंभर रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात येत असल्याने व्यापारी आणि जनसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सर्वसाधारणखर्या नोटेचीच कलर झेरॉक्स असावी, अशा पद्धतीच्या या नोटा असून, रात्रीच्या वेळी किंवा नोटांच्या बंडलातून बनावट नोटा खपवल्या जात असल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे.
पुसेगाव बाजारपेठेत बनावट नोटा खपवणारी जणू टोळीच कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. या बनावट नोटांचा कागद आणि रंग हुबेहुबचलनी नोटांसारखा असल्याने व्यावसायिकांना ही नोट खरी की खोटी हे कळणे दुरापास्त झाले आहे. नोटांचे बंडल व्यावसायिकाला दिले, तर त्याला त्या बंडलमधील बनावट नोट नेमकी कोणती हे समजत नसल्याने अनेकांची फसगत होत आहे. ज्याठिकाणी नोटा मोजण्याचे मशिन उपलब्ध नाही अशा ठिकाणी या नोटा खपवल्या जात असल्याने फसलेल्या दुकानदारालाहीबँकेत जाईपर्यंत आपली फसगत झाल्याचे कळत नाही.
अनेकदा ज्या दुकानांत ग्राहकांची गर्दी अधिक असेल, अशा ठिकाणी या नोटा घेताना फारशी काळजी घेतली जात नाही. त्या ठिकाणी अशी नोट खपवली, की ती पुन्हा अनभिज्ञपणे अनेक ठिकाणी जाते. जोवर बँकेत जात नाही किंवा मशिनपर्यंत पोहोचत नाही तोवर तिचाखोटेपणा कळत नसल्याने समस्या येत आहेत.
दरम्यान, पुसेगाव बाजारपेठेत दररोज कोट्यवधी रुपयाची उलाढाल होत असते. त्यामुळेच काही अज्ञातांनी बनावट नोटा बाजारपेठेमध्ये खपवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन या नोटा कोणी व कशा खपवल्या याचा तपास होणे गरजेचे आहे.पैसे भरणा करताना बँका बनावट नोटा नाकारतात. याबाबत पोलिसांत तक्रार दिली, तर चौकशीचा ससेमिरा मागे लागण्याच्या भीतीने बनावट नोटा स्वतःजवळ दडवून ठेवाव्या किंवा नष्ट कराव्या लागत असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.

