स्थैर्य, पिंपरी, दि.२५: पिंपरी चिंचवड महापालिकेत बनावट एफडीआर देऊन महापालिकेची फसवणूक करणाऱ्या फक्त 5 ठेकेदारांवर महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील सर्व ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यासह पालिका अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शहराध्यक्ष रफीक कुरेशी यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.
ठेकेदारांची एवढी मोठी फसवणूक महापालिका अधिकाऱ्यांच्या वेळीच लक्षात आली नाही की त्यांनी हेतुपूर्वक ही लबाडी लपवली. यामध्ये महापालिका लेखा विभाग व टेंडर विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामात कुचराई केल्याचे दिसते. त्यामुळे आरोपींना मदत केली म्हणून सहआरोपी करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा.
तसेच महापालिकेत आमदारांच्या दबावाखाली थेट पद्धतीने कामे देऊन पात्र असलेल्या ठेकेदारांना डावलण्यात येते, थेट पद्धतीने दिलेली सर्व कामे त्वरित थांबविण्यात यावीत; अन्यथा समाजवादी पार्टीच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा कुरेशी यांनी निवेदनात दिला आहे.