आत्तापर्यंत जिल्ह्याच्या पश्चिम भागात बर्‍यापैकी पाऊस; पूर्व भागात ठणठणाट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ जुलै २०२३ | सातारा |
यंदाच्या मोसमात जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस आज जुलैचा मध्य आला तरी सातारा जिल्ह्यात कुठे बर्‍यापैकी, कुठे चांगला तर कुठे ठणठणाट असा पडला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाबळेश्वर, कास, तापोळा पाटण, नवजा खोर्‍यात चांगला पाऊस झाला आहे. मात्र, जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात फलटण, माण-खटाव, कोरेगाव, कराड उत्तर, वाईचा उत्तर भाग या भागात पावसाने अजून शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळविले आहे. या भागात अजूनही पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. दरम्यान, आतापर्यंत पडलेल्या पावसाने कोयना धरणात २२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्याच्या जून महिन्याच्या उत्तरार्धात मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली मात्र तरीही उशिरा सुरू झालेल्या पावसाची सरासरी एकूण सरासरी पेक्षा उणे १३% इतकी राहिली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत तर पश्चिम भागामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून काही अपवाद वगळता पाऊस पडत आहे. पश्चिम भागात या पावसाचा जोर कमी अधिक होत असता तरी खरीप हंगामाच्या दृष्टीने उपयुक्त ठरत आहे.

पश्चिमेकडील कास, महाबळेश्वर, तापोळा, पाटण खोर्‍यात चांगला पाऊस झालेला आहे. यामुळे भात लागण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. तसेच पेरणीसाठी पावसाची उघडीप आवश्यक आहे. पश्चिम भागात शुक्रवारच्या तुलनेत गेल्या दोन दिवसांमध्ये पाऊस कमी जरी झाला आहे. सोमवार सकाळपासून पावसाची उघडझाप होत आहे. १ जूनपासूनचा विचार केला तर महाबळेश्वर येथे सर्वाधिक १३५२ मिलिमीटर नवजा येथे १२४० मिमी, कोयनानगर येथे ८७४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

कोयना धरणात २२.१२ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणात १२,८६८ क्युसेक वेगाने पाणी येत आहे. मागील काही दिवसांपासून धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.


Back to top button
Don`t copy text!