स्थैर्य,मुंबई, दि. ४: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू आहे. यामध्ये त्यांनी पेट्रोल दरवाढीचे समर्थन केले आहे. तसेच शिवसेना पेट्रोल दरवाढविरोधात नौटंकी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राज्य सरकारनेच कर कमी करावे किंमती कमी होतील असे ते म्हणाले आहेत.
शिवसेनेचे आंदोलन म्हणजे नौटंकी
इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, शिवसेनेने पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात मोर्चा काढण्यापूर्वी राज्याचे टॅक्स कमी करावे. शिवसेनेने मोर्चा काढण्यापेक्षा टॅक्स कमी करावे. आमचे सरकार असताना टॅक्स कमी करण्यात आले होते. दोन रुपयांनी पेट्रोल-डिझेल चे दर कमी झाले होते. यामुळे राज्य सरकारने टॅक्स कमी करावे. तसेच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेने काय आरोप केला हे माहित नाही, मात्र खंडणीखोरीचे आरोप शिवसेनेवर नेहमीच होत असतात.
शेतकरी आंदोलनाच्या नावे सगळे पोळी भाजत आहेत
यासोबतच शेतकरी आंदोलनाला भांडवल करून स्वतःचे राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न सर्वांकडून केला जात आहे. याच निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जो तो ज्याची त्याची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय असेही फडणवीस म्हणाले.
हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी असू शकत नाही
हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपाकडे नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा आहे असे दिसते. जनता पर्याय शोधू लागते तेव्हा तो निर्माणही होतो, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमात केले होते. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ‘हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी असू शकत नाही. हिंदुत्व हे जगावे लागत असते. केवळ भाषणातून बोलून चालत नाही. ज्यावेळी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे जनाब बाळासाहेब होतात आणि ज्यावेळी शिवगान स्पर्धा बंद होते आणि अजान स्पर्धा सुरु होते तेव्हा अशा प्रकारचे वक्तव्य द्यावे लागले. याच कारणामुळे त्यांनी कदाचित हे वक्तव्य केले. हिंदुत्व आमची मक्तेदारी नाही, पण तुम्ही का हिंदुत्व सोडले एवढेच सांगा’ असा सवालही फडणवीसांनी केला आहे.
सरकार शरजीलला पाठीशी घालत आहे
राम मंदिरासाठी निधी गोळा केला जातोय. राम मंदिरचे पैसे जनतेने द्यावे की सरकारने द्यावे , यावर सामनामध्ये अग्रलेख लिहिण्यात आला. मात्र शरजील प्रकरणावर अग्रलेख यायला 4 दिवस लागतात. यावरुनच स्पष्ट होते की सरकार शरजीलला पाठीशी घालत आहे. आम्ही ज्यावेळी आंदोलन केले त्यानंतर सरकारला जाग आली आणि कार्यवाही करण्याचे सांगण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.