
स्थैर्य, फलटण, दि. १० ऑगस्ट : देवेंद्र फडणवीस हे मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावण्याचा डाव आखत असून, त्यांचे हे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, असा घणाघाती आरोप मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. २९ ऑगस्टच्या ‘चलो मुंबई’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फलटण येथील सजाई गार्डनमध्ये आयोजित मराठा समाजाच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, “फडणवीसांनी ओबीसी नेत्यांना महाराष्ट्राच्या खर्चाने गोव्याला नेऊन मराठा-ओबीसी वाद वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मराठा आणि ओबीसी बांधावर राहणारे भाऊ असून, त्यांच्यात कधीही वाद होणार नाहीत. फडणवीसांनी ओबीसींसाठी तरी काय केले?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“फडणवीसांची कूटनीती आता सर्वच पक्षांतील मराठा नेत्यांनी ओळखली आहे. त्यामुळे येत्या २९ ऑगस्टला कोट्यवधी मराठे मुंबईत धडकतील. प्रत्येकाने आपल्या वाहनांनी कुटुंबासह मुंबईला यावे. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही,” असे जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.
धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास पश्चाताप होईल
पत्रकारांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देण्याच्या हालचालींबाबत विचारले असता, जरांगे-पाटील म्हणाले की, “अजित पवार काय, फडणवीस सुद्धा त्यांना मंत्रिपद देऊ शकणार नाहीत. दिलेच, तर त्यांना नक्कीच पश्चाताप होईल.” भावजयाला न्याय देऊ न शकल्याचा आणि संतोष देशमुख प्रकरणात अनेक कॉल केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
