ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा

जिल्हाधिकारी संतोष पाटील ; ऊस दराबाबत सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष व शेतकरी संघटनेची बैठक


स्थैर्य, फलटण, दि. 20 नोव्हेंबर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. अद्याप ज्या कारखान्यांनी ऊस दर जाहिर केलेला नाही त्यांनी आपला दर तातडीने जाहीर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

ऊस दराबाबत सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक व शेतकरी संघटना यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
या सभेला पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, उपजिल्हा निबंधक संजय सुद्रिक, प्रादेशिक उपसंचालक (साखर) प्रशांत सुर्यवंशी, विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (साखर) अजय देशमुख, सदाशिव गोसावी यांच्यासह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ऊस वाहतूक करणार्‍या वाहन धारकांनी नियमांचे पालन करावे, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले अपघात होऊ नये यासाठी ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांवर रिफ्लेक्टर लावावा. कारखान्यांकडील वजन काट्याची काटेकोर तपासणी करावी. ऊस तोड कामगार ऊस तोडीचे अतिरिक्त पैसे मागत असल्यास कारखान्यांकडे तक्रारी करावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सभेत केल्या.
कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे बु. ता कराड, जयवंत शुगर्स धावरवाडी ता. कराड , सह्याद्री साखर कारखाना यशवंत नगर, ता. कराड 3 हजार 500 रुपये , ग्रीन पॉवर शुगर्स गोपुज ता. खटाव 3 हजार 300, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर ता. पाटण 3 हजार रुपये सभेपुर्वी कारखान्यांनी दर निश्चित केले होते हेच दर अंतिम करण्यात येणार असल्याचे कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सभेत सांगितले.
तर अथनी शुगर्स, शेवाळेवाडी ता. कराड, शिवनेरी शुगर्स जयपुर ता. कोरेगाव, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना शाहूनगर शेंद्रे, सातारा, जरंडेश्वर शुगर मिल्स चिमणगाव ता. कोरेगाव यांनी 3 हजार 500 रुपये कल्लापा अण्णा आवाडे (लि श्रीराम सहकारी साखर कारखाना) फलटण 3 हजार 10, खटाव-माण ग्रो प्रोसेसिंग पडळ ता. खटाव 3 हजार 300 या कारखान्यांनी हा दर सभेत जाहीर केला.
शरयु ग्रो इंडस्ट्रीज कापशी ता. फलटण, श्री. दत्त इंडिया साखरवाडी ता. फलटण, किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज ता. वाई, खंडाळा शेतकारी सहकारी साखर कारखाना, खंडाळा, प्रतापगड (भागीदारी तत्वावर अजिंक्य सहकारी ) सहकारी साखर कारखाना कुडाळ ता. जावली व स्वराज ग्रीनपॉवर अँड फ्युएल लि. उपळे ता. फलटण या साखर कारखांनी अद्यापर्यंत ऊस दर जाहिर केला नाही तरी लवकरात लवकर ऊस दर जाहीर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सभेत दिले.


Back to top button
Don`t copy text!