
सातारा – सातारा भूषण पुरस्कार डॉ. जेष्ठराज भालचंद्र जोशी यांना प्रदान करताना दत्तप्रसाद दाभोलकर . त्यावेळी शेजारी डावीकडून डॉ.अच्युत गोडबोले, डॉ. ज्ञानदेव म्हस्के, डॉ.अनिल पाटील, सौ. प्रतिभा ताम्हणकर ,अशोक गोडबोले. (छाया – अतुल देशपांडे, सातारा)
स्थैर्य,सातारा, दि. 28 डिसेंबर : जगात भारत देशाचे दरडोई उत्पन्न हे कमी आहे. आज आपण 25 पट उत्पादन शेतीतून कमी घेतो आहे. कोणतेही पीक असू दे. त्या शेतातील साधन संपत्तीचा योग्य उपयोग आणि वापर करताना आपण शेती गरिबीतून श्रीमंतीकडे कशी नेऊन समृद्ध करता येईल हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करणे शक्य होईल यासाठी ही शेती व जीवनात यशस्वी होण्यासाठी सतत नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिकतेचा शोध घ्या ,अभ्यास करा. असे आवाहन जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी केले.
सातारा येथील रा.ना.गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्यावतीने 35 वा सातारा भूषण पुरस्कार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञ व विचारवंत दत्तप्रसाद दाभोलकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के, विठामाता विद्यालयाच्या माजी शिक्षिका सौ. प्रतिभाताई ताम्हणकर, गोडबोले चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अशोक गोडबोले, डॉ.अच्युत गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी रामनामी शाल ,चाळीस हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, मानपत्र व पेढ्यांचा हार घालून डॉ.ज्येष्ठराज जोशी यांना सातारा भूषण पुरस्कार डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मसूर ग्रामस्थ समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ व विविध संस्थांच्या वतीने ज्येष्ठराज जोशी यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जेष्ठ करसल्लागार स्वर्गीय अरुणराव गोडबोले व त्यांच्या भगिनी स्वर्गीय शारदा शिंत्रे यांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
डॉ.अच्युत गोडबोले म्हणाले, डॉ.ज्येष्ठराज जोशी यांच्या या निवडीबद्दल ट्रस्टला विशेष आनंद होत आहे. 1991 मध्ये प्रथम पुरस्कार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर अनेक नामवंत असे समाजाला योगदान देणारे विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देण्यास प्रारंभ झाला. यावर्षी निवड झालेले पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांची निवड ही स्वर्गीय अरुणराव गोडबोले यांनीच केली होती. पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी हे गेली 55 वर्षे ज्ञानदानाचे काम करत आहेत. त्यांनी दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना पीएचडीचे शिक्षणाचे मार्गदर्शन केले आहे. व्ही.डी.सी.टी. यासोबत मुंबईचे विद्यापीठ येथे शिक्षक व प्राध्यापकांना तसेच होमी भाभा इन्स्टिट्यूटमध्येही डीन म्हणून काम पाहत आहेत. पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी देशात, परदेशात अनेक व्याख्याने दिलेली आहेत. डॉ. ज्येष्ठराज जोशी यांना 2014 पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर मसूरच्या ग्रामस्थांनी आपल्या माणसाचे झालेले कौतुक पाहून त्यांचा हत्तीवरून स्वागत मिरवणूक काढली होती.
याप्रसंगी जोशी यांच्या पत्नी सौ. ऋजुता जोशी यांचाही साडी चोळी व पुष्पगुच्छ देऊन सौ.अंजली गोडबोले, व डॉ.सौ.गौरी ताम्हणकर यांनी सत्कार केला.
सौ. प्रतिभा ताम्हणकर म्हणाल्या, ज्येष्ठराज यांची निवड या पुरस्कारासाठी खरोखरच सार्थ आहे. सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखे गुणीजनांचे कौतुक करण्याचे काम स्वर्गीय अरुणरावांनी केले. जेष्ठराज यांची ओळख ही बोरकर यांच्या ‘नाही पुण्याची मोजणी,नाही पापाची टोचणी,’ यासारख्या सहज सुंदर जीवनातून साकारली आहे. ज्येष्ठराजांची बटू वामन मूर्ती मी शाळेपासून अनुभवते आहे. ज्येष्ठराज जोशी यांचा विनम्रपणा हा वाखाणण्याजोगा आहे. त्यांना मिळालेले पद, पुरस्कार हे देशातील गोरगरीब शेतकर्यांच्या हितासाठी वापरत त्यांनी निर्माण केलेली विज्ञान परिषद ही संस्था खरोखरच गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून घडवत आहे .आजवर अनेक पुरस्कारांचे मिळालेले धनादेश त्यांनी जसेच्या तसे या परिषदेला अर्पण केले आहेत. मसूर गावाशी असलेले दृढ नाते आजही तितकेच घट्ट आहे. आज स्वतःची गावातील घर व जागा त्यांनी नवीन विज्ञान प्रयोगशाळा बांधण्यासाठी संकल्पनातून दिली आहे.
कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के म्हणाले, आकाशाच्या उंचीच्या माणसांसोबत बसण्याचा आज योग मला या कार्यक्रमात मिळत आहे. जोशी सरांचे कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व हे अंतर्मुख करायला लावणारे आहे. अनेक पुरस्कारात मिळालेले निधी हे त्यांनी विज्ञान परिषदेसाठी दान केले आहे. त्यांचे अनेक संशोधनाचे विषय आजही आपणाला अनाकलनीय आहेत. जिल्ह्याची सुपीक मातीही केवळ शेतासाठीच नव्हे तर साहित्य, राजकारण ,विज्ञान क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणार्या अनेक रत्नांना घडविणारी आहे. जोशी सरांच्या संशोधनाचा अभ्यास 9000 संशोधकांनी करून आपले संशोधन पुढे नेले आहे.
डॉ. अनिल पाटील म्हणाले, गोडबोले कुटुंबियांचे व पाटील परिवारांचे तीन पिढ्यांचे संबंध दृढ आहेत. रयत शिक्षण संस्थेत जगाची शिक्षण पद्धती बदलत असताना आयओटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इनईपी यासारख्या अत्याधुनिक क्षेत्राचे मार्गदर्शनही देण्यासाठी जोशी सरांसारखे मार्गदर्शक हवे आहेत. जगाच्या सोबत वाटचाल करताना आपण आधुनिक विकास केंद्र उभारणी गरजेचे आहे. सध्या रयतकडे 108 पेटंट असली तरी त्याचा उपयोग हा बदलत्या काळासाठी करता आला पाहिजे. सर्वात वेगाने जे बदल घडत आहेत. त्यासाठी पारंपारिक शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल करून थिंक टँकद्वारे आता विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही मार्गदर्शनाची गरज आहे.
डॉ. ज्येष्ठराज जोशी म्हणाले, हा पुरस्कार मी कर्मवीरांच्या भूमीत घेतो आहे त्यात दोघांचेही योगदान मोठे आहे. सातारचा मोठा अभिमान आमच्या कुटुंबाला आहे. संशोधन करण्यासाठी खूप पैसा, अद्यायावत प्रयोगशाळा, व्यापक इंटरनेट, वाचनालय व चांगले विद्यार्थी लागतात हे खोटे आहे. आपला देश गरीब आहे ,आपले दरडोई उत्पन्न कमी आहे. शेतीकडे आपले दुर्लक्ष होत आहे. इंडस्ट्रियल व शेती उद्योगात आपण गरीब असलो तरी बाहेर देशातून भरपूर मागवत आहोत. देशात वीस पट टोमॅटो कमी पिकवतोय. चिलखत, कच्चे तेल, खाद्यतेल आपण मोठ्या प्रमाणात परदेशातून मागवतो. औद्योगिक व शेतीतून कमी पैसे मिळवून आपण ते दुसर्यांना देत आहोत. नवीन खत कारखान्यासाठी सुद्धा बाहेरूनच पाच हजार पट पैसे देऊन आपण ते उभारत आहोत. एका बाजूला आपण एकत्र येऊन जगाच्या उत्पन्नात वाढ करत आहोत. आपण आजही दोन पट ते वीस पट कमी उत्पादन करतो आहे. शेतीतील टाकाऊ वस्तूंचा उपयोग अभ्यासातून आपण बायोगॅस, लिक्विड व चारकोल निर्मिती करून करू शकतो. ज्यातून आपल्याला अतिशय चांगले फायदेशीर उत्पादन व कमाई करू शकतो. नॅनो टेक्नॉलॉजीतील नॅनो युरिया,नॅनो पोटॅश, नॅनो फॉस्फरस हे टेक्निक डेव्हलप केले तर 50 टक्के उत्पादनात वाढ मिळाली आणि एवढेच नव्हे तर 50% पेक्षा 300 पट वाढ मिळाल्याचे मी उदाहरण स्वतः पाहिले आहे. कारखाना उभारण्यासाठी 30 कोटी खर्च अपेक्षित असताना तेवढाच फायदा दरवर्षी त्या कारखान्यातून काढता येईल. आणि याच संकल्पनेतून मी मसूर येथे असा नवा प्रकल्प उभारत आहे. ध्येय सोपे नसले तरी नवीन पिढीने प्रश्न तयार करावेत व आपले उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करावा. यशस्वी होण्यासाठी शिकत रहा, नवनवीन तंत्रज्ञान जवळ करा. आज बांबू शेतीतूनही खूप मोठा फायदा उपलब्ध होऊ शकतो याचा विचार आवश्यक शेतकर्यांनी करणे जरुरीचे आहे.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर म्हणाले, आनंददायी, प्रेरणादायी आणि सांस्कृतिक असा हा सोहळा साजरा होताना आज कारुण्याची झालर ही प्राप्त झाली आहे .स्वर्गीय अरुण याची आठवण होताना 35 वर्षांपूर्वी सुरू केलेला हा पुरस्कार सोहळा आता हा संपूर्ण राज्यालाच नव्हे तर देशातील प्रत्येक जिल्ह्यात घडविणारा उपक्रम म्हणून पथदर्शक झाला आहे. पुरस्कार देताना धर्म, जात, विचारधारा याचा विचार कधीही केला गेला नाही. समाजाला उपयोगी व्यक्तीला निवडून हे पुरस्कार देण्याची ही परंपरा खरोखरच कौतुकास पात्र ठरणारी आहे. प्रथम पुरस्कारसाठी निवडले गेलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्यानंतर 17 वर्षांनी पुरस्कार मिळवणारे शरद जोशी व आता 35 व्या वर्षी निवड झालेले ज्येष्ठराज जोशी हे तीन जोशी हे खरोखरच मोठे कर्तृत्ववान आहेत. पहिल्या दोघांची ओळख आपणाला आहे. मात्र ज्येष्ठराज जोशी यांचे विज्ञानातील अलौकिक कर्तुत्व आपणाला माहीत नाही. माणूस किती जमिनीशी जपला जाऊ शकतो हे उदाहरण पाहता सबंध गावाने जोशी यांची काढलेली मिरवणूक ही विलक्षण आहे. जोशी सरांचे संशोधन हे अतिशय महत्त्वाचे आहे. आज स्वर्गीय प्रा. नरगुंद सरांनंतर ज्येष्ठराज जोशी सरांना असलेली प्रगल्भ माहिती व त्यांच्या ज्ञानाचा वापर यातूनच त्यांना मिळालेला हा सन्मान हा गौरवपूर्ण व अभिमानाचा वाटतो. सातारा भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्व जोशींचे सत्कार ही उंची गाठणारे आहेत. जेथे हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर या सर्वांनाच देश पातळीवरचे पुरस्कार मिळाल्याची परंपरा आहे ही खरोखरच गौरवपूर्ण आहे.
या कार्यक्रमाचे प्रद्युम्न गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास सौ. अंजली गोडबोले, डॉ. अनुराधा गोडबोले, डॉ. चैतन्य गोडबोले, उदयन गोडबोले, आर्यन गोडबोले तसेच श्रीराम नानल, डॉ. अजित पाटील, डॉ. गायकवाड, जेष्ठ पत्रकार मधू नेने, श्रीकांत कात्रे, डॉ. धनंजय बोधे, संदेश शहा, बाळासाहेब कुलकर्णी, दिलीप पाठक, विनोद झंवर, भालचंद्र जोशी, गौतम भोसले, श्रीकांत शेटे, अनिल काटदरे, पराग काटदरे, जोशी परिवाराचे कुटुंबातील सदस्य मसूर गावचे ग्रामस्थ यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

