स्थैर्य, दि.२: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्राच्या तज्ज्ञ समितीकडून पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) ची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला सशर्त परवानगी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. आता ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय)च्या परवानगीनंतर या दोन्ही व्हॅक्सीनला लवकरच इमरजंसी अप्रुव्हल मिळू शकेल.
आतापर्यंत तीन कंपन्यांनी अप्रुव्हल मागितले
आतापर्यंत पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII), भारत बायोटेक आणि फायजरने देशात इमरजंसी अप्रुव्हलची परवानगी मागितली आहे. सीरम इंस्टीट्यूट कोविशील्ड नावाने व्हॅक्सीन बनवत आहे. याला सीरम ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि फार्मा कंपनी एस्ट्राजेनेकासोबत मिळून तयार करत आहे. सीरम इंस्टीट्यूटशिवाय स्वदेशी व्हॅक्सीन कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकने बुधवारी समितीसमोर प्रजेंटेशन दिले होते. तर, अमेरिकन कंपनी फायजरने आपले प्रेजेंटेशन सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे. परंतू, फायजरला WHO ने एका दिवसापूर्वीच इमरजंसी अप्रुव्हल दिला आहे.
उद्यापासून संपूर्ण देशात व्हॅक्सीनचा ड्राय रन
तज्ज्ञ समितीकडून परवानगी मिळाल्यानंतर कंपन्याचा अर्ज ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)कडे फायनल अप्रूव्हलसाठी जाईल. सरकार याच महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. यासाठी उद्या म्हणजेच 2 जानेवारीपासून संपूर्ण देशात लसीकरणाचा ड्राय रन केला जाईल.
यापूर्वी गुरुवारी ड्रग्स कंट्रोलर जनरल डॉ. वीजी सोमानी यांनी म्हटले होते की, नवीन वर्ष आपल्यासाठी आनंददायी असेल. कारण, आता आपल्या हातात काहीतरी आहे. यावरुन असा अंदाज लावला जात आहे की, लवकरच व्हॅक्सीनला परवानगी मिळेल. अमेरिकेनंतर भारत दुसरा सर्वात संक्रमित देश आहे. सरकार पुढील सहा ते आठ महिन्यात देशातील तीस कोटी नागरिकांना लस देण्याची याजना आखत आहे.
कोविशील्ड सर्वात स्वस्त व्हॅक्सीन
कोरोना लसीमधील ऑक्सफोर्डची कोविशील्ड व्हॅक्सीनवर सरकारच्या आशा आहेत. कंपनीने यापूर्वीच सांगितले आहे की, व्हॅक्सीन तयार झाल्यावर आधी भारतात दिली जाईल. नंतर, इतर देशात एक्सपोर्ट होईल. दुसरीकडे, सर्वात मोठी व्हॅक्सीन निर्माता कंपनी सीरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी सोमवारी सांगितले की, ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका व्हॅक्सीनचे पाच कोटी डोज तयार आहेत. येत्या मार्चपर्यंत 10 कोटी आणि जूनपर्यंत 30 कोटी डोज तयार केले जातील.