
स्थैर्य, रहिमतपूर, दि. 27 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गावातील रुग्णांना गावातच उपचार मिळण्यासाठी धामणेर येथे आदर्शवत व ऑक्सिजनयुक्त मोफत केअर सेंटरची उभारणी करण्यात आली. या गावच्या सामाजिक बांधिलकीचा आदर्श इतर गावांनी घेत एकजुटीच्या माध्यमातून कोरोनाला हद्दपार करावे, असे आवाहन पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
धामणेर, ता. कोरेगाव येथे श्री मारुती देवस्थान ट्रस्ट व धामणेर ग्रामपंचायत यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शेखर सिंह होते. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, तहसीलदार रोहिणी शिंदे, कर्नल प्रताप पवार, अरुण पवार, सरपंच शहाजी क्षीरसागर, आनंदराव कणसे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. पाटील म्हणाले, अलीकडे कोरोनाने गावागावात प्रवेश केला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत आहे. या कोरोना सेंटरमुळे लोकांच्या मनातील भीती कमी होणार असून 10 बेडच्या कोरोना केअर सेंटरचा फायदा गावातील लोकांना होणार आहे.
शेखर सिंह म्हणाले, धामणेर हे राज्यातील आदर्शवत गाव आहे. कोरोना काळात लोकांनी पुढाकार घेऊन लोकांच्या सोयीसाठी केलेला हा कोरोना केअर सेंटर उपक्रम नावीन्यपूर्ण व स्तुत्य आहे.
शहाजी क्षीरसागर यांनी प्रस्ताविक केले. यावेळी बी.डी.ओ. क्रांती बोराटे, ए. आर. सुद्रिक, डॉ. शिंदे, डॉ. पाटील, सोसायटीचे चेअरमन, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.