दैनिक स्थैर्य | दि. १४ मार्च २०२३ | फलटण |
१३ मार्च ते १८ मार्च दरम्यान इतिहास सप्ताहाचे आयोजन करून महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने इतिहासकालीन दुर्मिळ नाणी व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन भरविले होते. श्री. भगत व श्री. बर्गे यांनी आपला छंद जोपासून इतिहासकालीन वस्तूंचा संग्रह केला आहे. त्याचे प्रदर्शन आज मुधोजी महाविद्यालयामध्ये करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन देऊर महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्राध्यापक ओवाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, चलनी नाणी हा एक इतिहासकालीन दस्तऐवज असून त्यावर असलेल्या मजकुरावरून ऐतिहासिक पुरावे उपलब्ध होतात. ज्यावरून वस्तूनिष्ठ इतिहासाची मांडणी करता येते. म्हणून अशा प्रकारच्या इतिहासकालीन वस्तूंचे संग्रहण इतिहास जिवंत राहण्यासाठी उपयुक्त ठरते.
प्राचार्य डॉक्टर पी.एच. कदम यांनी अशा प्रकारच्या प्रदर्शनामुळे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला चालना मिळेल, असे सांगताना भारतात सुवर्ण नाणी व्यवहारात चालू शकली नाहीत. कारण भारतीयांना सोन्याचे जास्त आकर्षण असल्यामुळे व्यवहारात नाण्यांचा वापर न करता लोक त्याचा संग्रह करू लागले. त्यामुळे अन्य धातूंची नाणी विकसित करण्यात आली.
या प्रदर्शनाला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबरच निबकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनीही भेट दिली. या उपक्रमासाठी इतिहास विभागप्रमुख प्राध्यापक अनिल टिके, प्रा. विशाल मोरे, प्रा. योगिता मठपती व प्रा.अविनाश कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.