‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑगस्ट २०२२ । नवी दिल्ली । महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती  प्रदर्शन व विक्रीला सुरुवात झाली आहे. प्रदर्शन व विक्री  ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुरु राहणार आहे.

महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या मूर्तींना  बाजारपेठ  उपलब्ध व्हावी तसेच, दिल्लीतील मराठी व अमराठी गणेशभक्तांना गणेशमूर्ती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दिल्लीस्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने गेल्या ३० वर्षांपासून गणेशमूर्ती व पुजेच्या साहित्याची विक्री व प्रदर्शन भरवण्यात येत आहे. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात 3० गणेश मंडळांमध्ये गणेशोत्सव साजरा होतो.

महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती व पुजेचे साहित्य खरेदीसाठी पहिल्याच दिवशी  लोकांची वर्दळ सुरु झाली असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या कोविड-१९ महामारीच्या संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी ग्राहकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. मास्क, सॅनिटायजरचा वापर आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करून गणेशमूर्ती व पूजेच्या साहित्याची खरेदी होत आहे. येथे प्रदर्शन व विक्रीकरिता असलेल्या गणेशमुर्तींची कमाल उंची ३ फूट आहे. येथील नंदा एस्कोर्टस, त्रिभोवनदास झवेरी, उद्योजक, विविध क्षेत्रांतील मान्यवर यांच्यासह गणेश मंडळांनी गणरायाच्या मोठ्या मूर्ती राखीव करून ठेवल्या आहेत.

ठाणे येथील मंदार सुर्यकांत शिंदे हे मागील २४ वर्षांपासून ‘मऱ्‍हाटी’ एम्पोरियममध्ये गणेशमूर्ती विक्री व प्रदर्शनासाठी ठेवतात. एम्पोरियमच्या दालनात यंदा लहान मोठया आकाराच्या एकूण 1000 गणेशमूर्ती आहेत. या सर्वच मूर्ती शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या अर्थात पर्यावरणपूरक आहेत. 6 इंच ते 3 फुटापर्यंतच्या गणरायाच्या मूर्ती येथे उपलब्ध असून 500 रूपयांपासून ते 30 हजार रूपयांपर्यंत या मूर्तींची  किंमत आहे.

महामंडळाच्या बाबा खडकसिंह मार्गवरिल ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम या दालनात गणेशचतुर्थी अर्थात ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. अधिक माहितीकरिता महामंडळाच्या 011-23363366 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!