स्थैर्य, कातरखटाव, दि. 09 : मुंबई च्या चेंबूर परिसरातून गेल्या आठवड्यात आपल्या मूळ गावी पळसगाव (ता. खटाव ) येथे आलेल्या एका युवकाचा सोमवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पळसगाव व परिसरात खळबळ उडाली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सर्वत्र लॉक डाऊन आहे. कडक लॉकडाऊन असले तरी गेले काही दिवस वेगवेगळ्या मार्गाने मुंबई पुणे येथील लोकांनी गावाकडे धाव घेतली आहे. पळसगाव मध्येही गेल्या दोन महिन्यात सुमारे शंभर जणांनी गावाकडे धाव घेतली आहे. गत आठवड्यात दोन महीला, दोन मुली, व पाच पुरुष असे नऊ जण मुंबई वरून गावी आले होते. त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोरंटाईन करण्यात आले होते. यापैकी ४१ वर्षीय युवकास गत दोन दिवसांपासून श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने सातारा येथिल जिल्हा रुग्णालयात दाखल करत. त्याच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले. त्याचा तपासणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, संबंधित युवकाच्या संपर्कात आलेल्या नऊ जणाना मायणी येथिल विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे असून तालुका आरोग्य अधिकारी डॉ युनूस शेख, पोलिस निरीक्षक अशोक पाटील, डॉ. वैशाली चव्हाण आदींनी गावास भेट देत पळसगावच्या सीमा व गाव सील केले आहे.