स्थैर्य, सातारा, दि. 23 : महावितरणकडून ग्राहकांच्या माथी लॉकडाउनच्या काळात विजेचे जादा बिल मारले गेले आहे. एकीकडे करोनामुळे जगणे अवघड झाले असताना हा बिलांचा आर्थिक भुर्दंड भरावा लागत असल्याने महावितरणविरोधात संताप व्यक्त होत आहे.
महावितरणच्या या भोंगळ कारभाराला लगाम कोण घालणार, असा सवाल ग्राहकां-मधून उपस्थित केला जात असून वाढीव बिलांमुळे अधिकारी व ग्राहकांची शाब्दिक चकमक होत आहे.
महावितरणकडून दर महिन्याला वीज बिल दिले जाते. लॉकडाउनच्या काळातील बिलांबाबत सावळागोंधळ उडाला आहे. महावितरण कंपनीकडून या काळातील वीज बिले सरासरीप्रमाणे देण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांवर अतिरिक्त भुर्दंड पडला आहे. महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे शहर व परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज ग्राहकांना चुकीचे रिडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा रकमेची वीज बिले आली आहेत. या ग्राहकांनी भरमसाठ वीज बिले येत असल्याची तक्रार नोंदवण्यासाठी संबंधित कार्यालयाबाहेर रांगा लावल्या आहेत. मात्र, त्यांची दखलही घेतली जात नाही.
काहींना तर ही वीज बिले भरावीच लागली. वीज ग्राहकांना चुकीचे रिडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहर व उपनगरातील अनेक नागरिक वीज बिल दुरुस्तीसाठी शाखा कार्यालय व शहर मुख्य कार्यालयात येत आहेत. अनेक ग्राहक आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवून सकाळी शाखा कार्यालयात बिल दुरुस्तीसाठी जातात. मात्र तेथे अधिकारी जाग्यावर उपस्थित नसतात. महिला कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे बोलत असल्याच्याही तक्रारी आहेत. जादा बिल आले की, महावितरणच्या कार्यालयात ग्राहकांना महिन्याला वारी करावी लागत आहे. प्रत्येक वेळी अधिकारी यावेळी आलेले वीज बिल भरा, पुढील महिन्यात येणार्या वीज बिलात दुरुस्ती होईल, अशी उत्तरे देत असतात. मात्र पुढील वीज बिलात पहिले पाढे पंचावन्न असाच प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे.