स्थैर्य ,पुणे, दि, २८: लष्कराच्या वतीने रविवारी घेण्यात येणाऱ्या सर्वसाधारण सैन्य भरती परिक्षेचा पेपर लिंक केल्याप्रकरणी लष्कराची गुप्तचर संस्था आणि पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने कारवाई पेपर लिक करण्याचा पर्दाफार्श केला आहे. याप्रकरणी दोन ठिकाणी समांतर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर आज होणारी परिक्षा रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणात रविवारी सायंकाळीही वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई सुरु होती. बारामती येथून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी लष्करातून सेवानिवृत्त वडिलांच्या मुलाने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी हा मुळचा सांगली जिल्ह्यातील तासगावचा राहणार आहे. अली अख्तर, महेंद्र सोनावणे आझाद खान यांनी सर्वसाधारण सैन्यभरतीचे पेपर लिक करुन ते परिक्षेच्या आदल्या दिवशी उमेदवारांना पुरविणार असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार लष्कराचा गुप्तचर विभाग आणि पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखा यांनी एकत्रपणे छापे घालून कारवाई केली आहे.
हा तरुण जानेवारीमध्ये मैदानी परिक्षेत पास झाला होता. नंतर ५ फेब्रुवारी रोजी तो मेडिकलमध्येही पास झाला. त्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी बॉम्बे सॅपर्समधून ॲडमिट कार्ड घेऊन बाहेर आल्यावर त्याला आझाद खान हा भेटला. त्याने सध्या सुरु असलेल्या सोल्जर जीडी भरतीचे प्रमुख अख्तर खान व महेंद्र सोनावणे असून ते आपल्या परिचयाचे आहेत. त्यांना आर्मीमध्ये काही मुलांना भरती करायचे आहे. त्याला फिर्यादी तरुणाने होकार दिला. त्यानंतर त्याला ३ लाख रुपये दिल्यावर तुझे काम होईल, असे सांगितले. मात्र, त्याने २ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. तेव्हा त्यांनी १ लाख आता व उरलेले काम झाल्यावर द्यावे लागतील. २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परिक्षेचे प्रश्नसंच आहेत ते तुला देतो, सराव कर, असे आझाद खान याने सांगितले. त्यानंतर अली अख्तर याने फोन करुन फिर्यादीने आझाद याच्याकडे १ लाख रुपये दिले. त्याने काही सराव प्रश्नसंच व्हॉटसअपवर पाठविले. २८ फेब्रुवारीच्या परिक्षेसाठी २७ ला रात्री १२ वाजता महेंद्र सोनावणे हा परिक्षेचा पेपर देणार आहे, असे अली अख्तर याने सांगितले.
फिर्यादी हा शनिवारी पुण्यात आला. त्याने या तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी फोन उचलला नाही. फोन उचलला तर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच दरम्यान, पोलिसांनी फिर्यादीशी संपर्क साधल्यावर त्याला आपली फसवणूक झाल्याची लक्षात आले. दरम्यान, लष्कराचा गुप्तचर विभाग व पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी याप्रकरणी शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे घातले असून रविवारी रात्री उशिरापर्यंत हे चौकशीचे काम सुरु राहणार आहे.