फलटणमध्ये माजी प्राचार्यास तोतया पोलिसांनी लुटले; लाखोंचा ऐवज लंपास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२२ । फलटण । बँकेतील लॉकरमध्ये दागिने ठेवण्यासाठी निघालेल्या जेष्ठ नागरिकास आम्ही पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांच्या गाडीच्या डिकीतील पिशवीत असलेले सोन्याचे दागिने पळवून नेण्याचा थरारक प्रसंग लक्ष्मीनगर येथे घडला आहे. या प्रकारात संबंधित चोरट्यांना प्रतिकार करत असताना त्यांच्या दुचाकी बरोबर किमान वीस ते पंचवीस फूट फरफटत गेल्याने संबंधित जेष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. या प्रकारात त्यांच्याकडील साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरीस गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र हा आकडा मोठा असल्याची चर्चा आहे.

दरम्यान फलटण शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तर दस्तुरखुद्द पोलीस असल्याची बतावणी करून धाडसी लूटमार होवू लागल्याने जनतेमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. याबाबत आता खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीच लक्ष घालावे अशी मागणी जनतेतून होत आहे.

याबाबत घटनास्थळावरून सेवानिवृत्त प्राचार्य चंद्रकांत पाडुंरंग काळे वय ७७ रा. संजीवराजेनगर फलटण हे दि. १२ डिसेंबर रोजी गुजरात दर्शनाला जाणार होते. परराज्यात जायचे असल्यामुळे व घर बंद राहणार असल्याने ते बुधवार दि. ७ डिसेंबर रोजी घरात असणारे दागिने घेऊन ते बँकेतील आपल्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी मोटारसायकल वरून निघाले होते. लक्ष्मीनगर येथील जोशी हॉस्पिटल जवळील तिकाटण्यावर ते आले असता दुपारी पावणे एक ते एकच्या दरम्यान त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरून येत त्यांचा गाडीला गाडी आडवी मारून त्यांना थांबायला सांगितले. त्यांना थांबवून मी पोलीस अधिकारी आहे. केव्हापासून तुम्हाला हाक मारतोय, शिट्टी वाजवतोय तुम्हाला थांबता येत नाही का असे बोलत मी पुण्याचा क्राईम ब्रँचचा मोठा अधिकारी आहे असे सांगून व आयकार्ड दाखवले त्यावेळी त्याने तेथील अन्य एका इसमाची अंग झडती घेतली त्यामुळे काळे यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याने काळे यांच्या मोटारसायकलची चावी काढून घेत डिकीचे लॉक उघडून पिशवी उघडायला लावली. पिशवीमध्ये असलेल्या बॉक्समध्ये सोन्याचे दागिने त्याने पाहिल्यावर काळे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील दोन अंगठ्या सदर बॉक्समध्ये ठेवायला सांगितल्या. सदर पिशवीची गाठ मारून ती सीटवर ठेवण्यास सांगितले त्यावेळी दुसऱ्या इसमाने ती पिशवी घेऊन मी पोलीस अधिकारी आहे असे सांगणार्याच्या गाडीवर बसून निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काळे यांनी गाडीच्या पाठीमागील हॅन्डलला पकडून ती गाडी थांबविण्याचा व पाठीमागे बसलेल्या इसमास खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या प्रकारात ते गाडीबरोबर वीस ते पंचवीस फूट फरफटत गेले. यामध्ये त्यांना मोठी दुखापत झाली व सदर मोटारसायकल स्वार पळून जाण्यात यशस्वी ठरले.

फलटण शहर पोलीस ठाण्यात कोल्हापुरी साज, चैन, अंगठ्या, बांगड्या, पाटल्या, गंठणे आदी चाडेचार लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र दागिन्यांची वजन व त्यांची आजच्या बाजारभावाप्रमाणे होणारी किमंत फार मोठी असल्याची चर्चा घटनास्थळी होत होती. या प्रकारात जखमी झालेले प्रा. चंद्रकांत काळे यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


Back to top button
Don`t copy text!