
दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पार्टीकडून माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तगडा उमेदवार म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उतरवू शकतात; अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघाच्या नियोजनाबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध बैठका आयोजित केलेल्या होत्या. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघामधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरू आहे का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सध्या देशासह राज्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा प्लॅन सुरू आहे. त्यामध्ये शक्य तेवढ्या ठिकाणी उमेदवारच तगडा देऊन भारतीय जनता पार्टीसमोर मोठे आव्हान निर्माण करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ‘बालेकिल्ला’ समजल्या जाणार्या माढा लोकसभा मतदारसंघातून गतवेळेस अचानकपणे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले व निवडूनसुद्धा आले. सन २००९ साली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर २०१४ साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले; परंतु २०१९ साली रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत लोकसभेचे तिकीट घेऊन जिंकून सुद्धा आले. हाच मतदार संघ पुन्हा ‘इंडिया’च्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे येण्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी सध्या काँग्रेसच्या गोटात सुरू आहे.
पूर्वीच्या अनुभवामुळे पुन्हा दिल्लीच्या राजकारणात सक्रिय करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने केंद्र सरकारमधील महत्त्वाच्या जबाबदार्या होत्या. राज्यामध्ये मुख्यमंत्री होण्याच्या पूर्वी पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीच्या राजकारणामध्येच सक्रिय होते; परंतु पक्षाच्या आदेशानुसार पृथ्वीराज चव्हाण यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे लागले. त्यानंतर त्यांनी राज्याच्या राजकारणामध्ये लक्ष दिले आहे. आता पुन्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून पूर्वीच्या अनुभवी असलेल्या नेत्यांना दिल्लीच्या राजकारणामध्ये सक्रिय करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
… तर खासदार निंबाळकर व आमदार गोरे यांची पडद्यामागून मदतच होणार
माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे जरी सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये असले तरी त्यांचे व पृथ्वीराज चव्हाण यांचे संबंध हे संपूर्ण सातारा जिल्ह्याला नव्हे तर राज्याला ज्ञात आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याच्या पूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जात होते. यासोबतच आमदार जयकुमार गोरे व पृथ्वीराज चव्हाण यांचे सुद्धा संबंध अत्यंत निकटचे आहेत. पूर्वीच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत आमदार जयकुमार गोरे यांनी काम केलेले आहे व पृथ्वीराज चव्हाण यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांना कायमच झुकते माप दिलेले होते. त्यामुळे जर माढा लोकसभा मतदार संघामधून पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाले तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांची पडद्यामागून मदतच पृथ्वीराज चव्हाण यांना होईल, असे मत व्यक्त केले जात आहेत.
मोहिते – पाटील व नाईक – निंबाळकर घराण्याची असलेले संबंध पृथ्वीराज चव्हाणांसाठी फायदेशीर
माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जर पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घोषित झाली तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील व विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. पहिल्यापासूनच मोहिते – पाटील व नाईक निंबाळकर घराण्याचे आणि पृथ्वीराज चव्हाणांचे संबंध आहेत. त्यामुळे आगामी लोकसभेला जर संधी मिळाली तर या संबंधांचा नक्कीच फायदा होईल.