दैनिक स्थैर्य । दि. ०६ एप्रिल २०२३ । सातारा । मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण अभियानांतर्गत जिल्हयात शासकीय योजनांची जत्रा आयोजित करण्यात येत आहे. ही जत्रा यशस्वी करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी तसेच प्रांताधिकारी यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केल्या.
शासनाच्या विविध विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा एकाच दिवशी किमान 75 हजार लाभार्थ्याना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून शासकीय योजनांच्या जत्रेचा कार्यक्रम सातारा जिल्ह्यात संपन्न होणार आहे. या विषयी मार्गदर्शनासाठी कै. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृह येथे महसूल कर्मचारी व अधिकारी यांची बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्यमंत्री सहायता कक्षाचे गजानन पाटील, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक सतीश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे आदी उपस्थित होते.
महसूल विभागातर्फे लोकांना विविध प्रकारचे दाखले दिले जातात, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, सर्व प्रकारचे दाखले देण्यासाठी लागणारी तयारी तलाठी व मंडल अधिकारी यांनी करावी. ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरामध्ये जावून कुटुंबास भेट देवून त्यांना हव्या असणाऱ्या योजना तसेच दाखले यांची माहिती घ्यावी. रेशन कार्ड, जॉबकार्ड या विषयी असणारे प्रश्न लोकांमध्ये जावून सोडवावेत. या कामाचा रोज आढावा घेण्यात यावा. या विषयीच्या समन्वयाची जबाबदारी प्रातांधिकारी यांची असेल. ही शासकीय योजनांची जत्रा मोठया प्रमाणावर यशस्वी करुन जिल्हयास नावलौकीक मिळवून देणे ही आपली जबाबदारी असल्याचेही ते यावेळी म्हणाले.