दैनिक स्थैर्य | दि. १९ एप्रिल २०२३ | फलटण |
‘बागायतदरांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिंती गावाला शाळेसाठी स्वतःची इमारत उभी राहण्यासाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी मनापासून प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा माजी मुख्याध्यापक के. बी. चव्हाण यांनी व्यक्त करीत सर्वांच्या प्रयत्नाने जागेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, असे आवाहन केले आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री जितोबा विद्यालय जिंती येथील १९९३-१९९४ दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ व थंड पाणीपुरवठा व्हावा यासाठी ‘वॉटर प्युरीफायर’ समर्पण सोहळा तसेच १९९३-१९९४ बॅचच्या गुरूजनांचा आदर सत्कार व मार्गदर्शक मेळावा जिंती, ता.फलटण येथे ग्रामपंचायत हॉलमध्ये आयोजित केला होता. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून दूरध्वनीद्वारे माजी मुख्याध्यापक चव्हाण बोलत होते.
यावेळी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, जिंती गावाला श्री जितोबा देवाचा आशिर्वाद असून ‘बागायती गाव’ म्हणून सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात एक वेगळी ओळख असलेले हे गाव आहे. या गावात रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय असून मी स्वतः मुख्याध्यापक असताना शाळेला सुंदर इमारत व मुलांना खेळण्यासाठी मैदान तसेच भव्य असे वाचनालय, इतर सर्व गोष्टी प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केले. या गोष्टींसाठी ग्रामस्थ तसेच सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, यावेळी रामचंद्र यादव, उत्तमराव बागल, रामभाऊ अवताडे, लक्ष्मण वायदंडे, विजयराव शिंदे, श्रीमती पद्मिनी यादव, महादेव पोरे, एस. बी. भराडे, व्ही. एम. जगदाळे हे शिक्षक उपस्थित होते. तसेच जितोबा विद्यालय जिंती कमिटीचे एम. एन. रणवरे, पी. एन. रणवरे, राजूतात्या रणवरे व ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ज्या शिक्षकांनी व्यायामाची सर्व विद्यार्थ्यांना सवय लावली त्या बागल सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आम्हाला अभिमान वाटतो की, जी मुले शिकली त्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम व शाळेस दिलेली भेटवस्तू पाहून जो आनंद वाटला तो शब्दात सांगू शकत नाही. आयुष्यात कधीही असत्य स्वीकारू नका. असत्याचा कधीही विजय होत नाही असे सांगितले.
या कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला असून आम्हाला अभिमान वाटला, असे सांगत सर्वांना आशिर्वाद दिले.
सर्वप्रथम सर्व शिक्षकांचे जिंती येथील बसस्थानक येथे ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. त्यानंतर सर्व शिक्षकांना मिरवणुकीने वाजत-गाजत गावातील मुख्य मार्गावरून फुलांच्या वर्षाव करीत कार्यक्रमस्थळी नेले. यावेळी गावातील महिलांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर ग्रामपंचायत हॉल जिंती येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. कर्मवीर भाऊराव पाटील व काकींना अभिवादन करीत मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भोईटे व सुनीता शिंदे या माजी विद्यार्थ्यांनी केले. प्रास्ताविक विद्यमान मुख्याध्यापिका विद्या शिंदे यांनी केले, तर आभार ताराचंद आवळे यांनी मानले.
शिक्षक गेले भारावून
माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील मुलांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ‘वॉटर प्युरीफायर’ दिला. ही सामाजिक बांधिलकी पाहून शिक्षक भारावून गेले व याचे तोंडभरून कौतुक केले.
१९९३-१९९४ च्या बॅचचे शिक्षक येणार, ही बातमी जिंतीमध्ये वार्यासारखी पसरली आणि गावात एकच गर्दी उसळली. जागोजागी गावातील महिलांनी त्या सर्वच शिक्षकांचे औक्षण करीत फुलांच्या वर्षाव केला. यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात शिक्षकांचे मनोभावे स्वागत केले.