हरित सातारा घडवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा

ना. शिवेंद्रसिंहराजे ; किल्ले अजिंक्यतार्‍यावर 1 हजार वृक्षांची लागवड


दैनिक स्थैर्य । 22 जुलै 2025 । सातारा । निसर्ग व पर्यावरण रक्षणासाठी तसेच आपले सातारा शहर निसर्गसंपन्न व हरित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. केवळ झाडे लावून चालणार नाही तर, लावलेली झाडे जगवणे त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. एक जबाबदार सातारकर म्हणून प्रत्येकानेच आपले सातारा शहर हरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

किल्ले अजिंक्यतारा परिसरात ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या संकल्पनेतून आणि ’हरित सातारा ग्रुप’ यांच्या सहकार्याने 1 हजार झाडांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाच्या शुभारंभप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, जयवंत भोसले, भालचंद्र निकम यांच्यासह हरित सातारा ग्रुपचे कन्हैयालाल राजपुरोहित, सुनील भोईटे, बाळासाहेब गोताड, दिलीप भोजने, साळुंखे सर, अनिल मोरे आदी सदस्य उपस्थित होते.

ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण किल्ला हरित करण्यास प्रारंभ झाला असून ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच लावलेली झाडे जगवण्यासाठी, त्यांचे संगोपन करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. झाडांना पाणी घालण्यासाठी हौद निर्माण करण्यात आले असून किल्ल्यावर येणार्‍या लोकांनी उन्हाळ्यात हौदातील पाणी किल्ल्यावरील झाडांना घालावे अशी जागृती याठिकाणी करण्यात आली आहे. या उपक्रमाचे ना. शिवेंद्रसिंहराजेंनी कौतुक केले असून लावलेली झाडे जगवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे ते म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!