तळागाळातल्या समाज घटकांसाठी सर्वांनी पक्षपाती राहून भूमिका घेतली पाहिजे : प्रसिद्ध पत्रकार विजय चोरमारे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 30 नोव्हेंबर 2021 । फलटण । ‘‘समाजात आपल्या अवती-भवती जे घडतंय त्याचं प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे. तरच असे ‘माणूस’ म्हणून केंद्रीभूत असणारे साहित्य चिरंतन राहते. त्यासाठी साहित्यिक, पत्रकार, विचारवंत यांनी अभिव्यक्त झाले पाहिजे. विशेेषत: तळागाळातल्या पिचलेल्या, अन्यायग्रस्त अशा समाज घटकांसाठी या सर्वांनी पक्षपाती राहून भूमिका घेतली पाहिजे’’, अशी अपेक्षा साहित्यिक व प्रसिद्ध पत्रकार विजय चोरमारे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा, श्रीराम एज्युकेशन सोसायटी व सद्गुरु प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नामदेवराव सूर्यवंशी महाविद्यालयात आयोजित 9 व्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विजय चोरमारे बोलत होते. श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी – बेडके यांच्या हस्ते या संमेलनाचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण व प्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहून करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ उपस्थित होते.

‘‘महाराष्ट्रात चांदा ते बांदापर्यंत प्रत्येक गावात ज्यांचे नाव अजूनही आहे अशात माजी मुख्यमंत्री व भारताचे थोर नेते यशवंतराव चव्हाण यांचा समावेश असून त्यांनी राज्यातील पुरोगामी समाजसुधारकांच्या विचारांच्या दृष्टीने महाराष्ट्राला नेले. त्यासाठी सर्व क्षेत्रात ‘माणूस’ केंद्रस्थानी मानून अनेक क्रांतिकारक व दूरगामी निर्णय घेतले. राज्याची सांस्कृतिक, साहित्यिक व वैचारिक उंची वाढविण्यासाठीही त्यांनी नवा महाराष्ट्र नव्या विचाराने घडविला आणि पुढील आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली’’, असेही चोरमारे यांनी स्पष्ट केले.

‘‘देशाच्या राजधानीजवळ 1 वर्ष शेतकर्‍यांचे अभूतपूर्व आंदोलन सुरु आहे. त्यात 700 पर्यंत बळी गेले. आंदोलनात गाडी घालून 7 शेतकर्‍यांना चिरडले. तरीही या प्रश्‍नातील ‘माणूस’ महत्त्वाचा मानला गेला नाही. राजकारण काही असो, पण साहित्यिकांनी या जगण्याचा विषय असलेल्या आंदोलनाची संवेदनशील मनाने दखल घेतली नाही’’, अशी खंतही चोरमारे यांनी यावेळी व्यक्त केली.

‘‘शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांनी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तथापि अन्य राज्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे बोट सोडल्याचेच दिसून येते’’, असे सांगून चोरमारे म्हणाले, ‘‘राज्याची प्रगती म्हणजे कारखाने, धरणे, पूल, भव्य इमारती, चकचकीत रस्ते एव्हढेच नव्हे तर राज्यातील माणसाच्या मनाचा सांस्कृतिक व प्रबोधनात्मक विकास यातही असतो ही जाणीव राज्यकर्त्यांना असली पाहिजे. त्यादृष्टीने यशवंतरावांच्या विचारांचा, कार्य कर्तृत्त्वाचा जागर करणारी अशी संमेलने राज्याच्या जिल्ह्याजिल्ह्यात व्हावीत व त्यातून विचारमंथन झाले पाहिजे’’, अशी अपेक्षाही चोरमारे यांनी व्यक्त केली.

‘‘फलटणला सांस्कृतिक उंची असून ती जपण्याचे काम महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा अशा कार्यक्रमांतून नेहमीच करीत असते. यशवंतराव चव्हाणांच्या विचाराच्या उंचीचा नेता सध्याच्या राजकारणात दिसत नाही. यशवंतरावांच्या विचाराचे स्मारक म्हणून आम्ही फलटणला शैक्षणिक संकुल उभारले आहे. त्या माध्यमातून आम्ही यशवंतरावांच्या विचारांचा जागर करण्याचे काम करीत असल्याचे’’, सुभाषराव सूर्यवंशी – बेडके यांनी सांगितले.

‘‘यशवंतराव चव्हाण यांनी नवमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे घेताच मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यासाठी मोठे योगदान दिले. ते स्वत: उत्तम वक्ते, लेखक व रसिक वाचक, समीक्षक होते. पण महाराष्ट्रातील साहित्य संस्था, साहित्यिक यांनी यशवंतरावांच्या विचारांची, साहित्याची अजूनि पाहिजे तेव्हढी दखल घेतली नाही’’, अशी खंत व्यक्त करत रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, ‘‘खरं तर यापूर्वीच यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य अकादमी राज्यात व्हायला हवी होती. तसेच मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यासाठीच्या परिषदा, मंडळे यांना वाढीव अनुदान राज्यशासनाने दिले पाहजे.’’

या समारंभात ज्येष्ठ साहित्यिक व विक्रमी 40 ग्रामीण मराठी साहित्य संमेलने घेणारे विटा, जि.सांगली येथील रघुराज मेटकरी यांना राज्यस्तरीय ‘यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार’ विजय चोरमारे यांच्या हस्ते देण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व रु.5,000/- रोख असे या पुरस्काराचे स्वरुप होते. तसेच मसाप फलटण शाखा आयोजित राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील विजेते ‘वारसा’ (कार्यकारी संपादक, जयंत येलूरकर, नगर), ‘गुंफण’ (संपादक, बसवेश्‍वर चेणगे, मसूर, ता.कराड), ‘शब्दाई’ (संस्थापक वि.दा.पिंगणे, पुणे) यांचाही सन्मानपत्र व रोख पारितोषिक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.

संमेलनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील (शालेय गट) विजेते 1) अनुष्का जठार (मुधोजी हायस्कूल), 2) सुमित धाडचिरे (यशवंतराव चव्हाण हायस्कूल), 3) साक्षी ननावरे (वेणूताई चव्हाण हायस्कूल) तसेच खुल्या गटातील विजेते 1) श्रीमती जुबेदा दस्तगीरभाई मेटकरी, 2) क्षितीजा राजेंद्र गायकवाड, 3) सायली अर्जुन फरांदे (मुधोजी महाविद्यालय) यांचाही यावेळी श्रीराम विद्याभवनचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर व आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सदर निबंध स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.अशोक शिंदे, सौ.अलका बेडकिहाळ, प्रा.एस.एम.मेटकरी व प्रा.सौ.एस.जी.धुमाळ यांनी काम पाहिले. स्पर्धेचे संयोजन मसाप फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे यांनी केले. नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कवी संमेलनासाठी निवड झाल्याबद्दल कवि अविनाश चव्हाण व बालकवि सुयश ताराचंद्र आवळे यांचाही शुभेच्छा देवून विजय चोरमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मसाप शाखा अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांनी प्रास्ताविकात संमेलनाची व शाखा कार्याची माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले. संमेलन अध्यक्षांचा परिचय ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी करुन दिला तर गौरव पुरस्कार मानपत्र वाचन शाखा कार्यवाह ताराचंद्र आवळे यांनी केले. शाखा कार्यवाह अमर शेंडे, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य डॉ.दीपक राऊत, सौ.जयश्री रायते, मनोज फडतरे, वामन नेरकर यांनी सर्व स्पर्धा व संमेलन व्यवस्थेचे यशस्वी संयोजन केले. मसाप शाखेचे ज्येष्ठ सदस्य प्रा.विक्रम आपटे यांनी आभार मानले.

संमेलनास श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी, सदस्य शिवाजीराव सूर्यवंशी – बेडके, महात्मा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रविंद्र बर्गे, फलटण तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष केशव महाराज जाधव, कै.अनंतराव शेंडे फौंडेशनचे अध्यक्ष रमेशचंद्र शेंडे, मसाप शाखेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.मधुकर जाधव, प्राचार्य रविंद्र येवले, प्रसिद्ध कथाकथनकार प्रा.रविंद्र कोकरे, ज.तु.गार्डे यांचेसह विविध शाळा महाविद्यालयांचे शिक्षक, प्राध्यापक, मसाप सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!