दैनिक स्थैर्य । दि. ०३ नोव्हेंबर २०२२ । फलटण । भारतीय निवडणूक आयोगाने दि. ०९ नोव्हेंबर २०२२ ते दि. ०८ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी या कार्यक्रमांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या मतदारसंघातील एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी बनवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले.
फलटण येथील तहसीलदार कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप बोलत होते. यावेळी फलटणचे तहसीलदार समीर यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की, भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार राज्यामध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, २०२३ अंतर्गत दि. ९ नोव्हेंबर, २०२२ ते दि. ८ डिसेंबर, २०२२ या कालावधीमध्ये नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे मतदार यादीतील नोंद वगळणे वा दुरूस्ती करणेकामी अनुक्रमे अर्ज नमूना मागविण्यात येणार आहेत. तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, २०२३ अंतर्गत दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. सदर मतदार यादीवर नागरिकांनी हरकती/आक्षेप/दुरूस्ती दि. ८ डिसेंबर २०२२ अखेर सादर करावेत, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.
या वर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, २०२३ अंतर्गत विदयार्थी, महिला, दिव्यांग, घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीमधील व्यक्ती, तृतीय पंथीय व्यक्ती आणि देहविक्री करणाऱ्या महिला यांच्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिरे दि. ९ नोव्हेंबर २०२२ ते दि. ८ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये आपल्या मतदार संघातील विद्यालय / महाविद्यालय यांचेमार्फत १८ वर्ष पुर्ण झालेल्या परंतु मतदार नोंदणी न केलेल्या विदयार्थ्याची यादी घेण्यात येणार असून या शिबिरामध्ये मतदान केंद्र अधिकारी यांनी संबंधित महाविद्यालयातील विदयार्थ्यांचे मतदार नोंदणीचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत, अशी माहिती यावेळी फलटणचे तहसीलदार समीर यादव यांनी दिली.
महिला व दिव्यांग यांच्या मतदार नोंदणीसाठी दि. १२ नोव्हेंबर २०२२ व दि. १३ नोव्हेंबर २०२२ या दोन दिवसांमध्ये आपल्या मतदार संघामध्ये महिला व दिव्यांग यांच्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. महिलांसाठी विशेष शिबिरे राबविणेकामी महिलांसाठी कार्य करणाऱ्या शासकिय / अशासकिय संस्थांच्या प्रतिनिधींचे सहकार्य घेण्यात येईल. तसेच स्वयंसहायता गट, महिला बचत गट यांचेमार्फत महिला मतदार नोंदणी जनजागृती करणेत येणार आहे, असे ही यावेळी तहसीलदार समीर यादव यांनी स्पष्ट केले.
दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष शिबिरे मतदार संघातील दिव्यांगसाठी कार्य करणाऱ्या संघटना यांचेमार्फत १८ वर्ष पूर्ण असलेल्या दिव्यांगाची मतदार नोंदणी तसेच दुरूस्ती मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे, निवडणूक आयोग मतदानाच्या दिवशी दिव्यांगाना पुरवित असलेल्या सुविधांबाबत माहिती देण्याचेही उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. दि. २६ नोव्हेंबर २०२२ व दि. २७ नोव्हेंबर २०२२ या दोन दिवसांमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये तृतीय पंथीय व्यक्ती, देहविक्री करणार्या महिला आणि घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती यांच्यासाठी विशेष शिबिर आयोजित करणेत येणार आहे, असेही यावेळी तहसीलदार समीर यादव यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, २०२३ अंतर्गत नवीन नाव नोंदणी, वगळणी, दुरूस्ती, मतदार संघांतर्गत यादी भाग बदल, मतदार संघाबाहेर रहिवाशाचे स्थलांतर करणे व मतदार ओळखपत्र बदलून मिळणेसाठी विहित नमुन्यामध्ये अर्ज करिता येईल. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधील नागरिकांनी आपले नाव मतदार यादी मध्ये आहे का याची खात्री करावी व मतदार यादी मध्ये नाव नसेल तर विहित नमुन्यात अर्ज भरून व त्यानंतर मयत व्यक्ती दुबार नावे आणि कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांनी विशेष मोहिमेच्या वेळी विहित नमुन्यातील अर्ज भरून मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी सुद्धा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार समीर यादव यांनी यावेळी केले आहे.