विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२२ । मुंबई । इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रावर पेपरफुटी व कॉपीचे गैरप्रकार होऊ नयेत, याची खबरदारी घेण्याकरिता राज्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर परीक्षा कालावधीमध्ये अधिकचा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी याअनुषंगाने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे विनंती केली होती. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रा.गायकवाड यांनी केले आहे.

राज्यात दि. 15 मार्च 2022 पासून इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र निर्माण केल्यामुळे काही शाळांमध्ये प्रथमच परीक्षा घेतली जात आहे. परीक्षा केंद्रावर कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत तसेच नियमित अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. याअनुषंगाने राज्यात सर्वत्र परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्याबाबत सहकार्य करण्याची विनंती शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड यांनी गृहमंत्र्यांकडे केली होती.

याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, परीक्षेसंदर्भात गैरसमज पसरू नयेत, यासाठी माध्यमे, लोकप्रतिनिधी, स्थानिक नागारिक, पालक यांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रा.गायकवाड यांनी विधानपरिषदेत यासंदर्भात केले. ज्या केंद्रांवर कॉपीसारखे गैरप्रकार आढळून येतील, त्या केंद्रावर यापुढे परीक्षा घेण्याची मान्यता रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री यांनी केलेल्या विनंतीनुसार गृहमंत्र्यांच्या निर्देशावरून गृह विभागाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!