पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने योगदान देऊन जास्तीत जास्त झाडे लावावीत – विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.०१ एप्रिल २०२२ । सातारा । पर्यावरणातील असमतोलामुळे अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, अति पाऊस, तापमान वाढ अशा विविध समस्यांना आज सामोरे जावे लागत आहे. भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लावू नयेत यासाठी  जास्तीत जास्त झाडे लावून पर्यावरणाचा समातोल राखला पाहिजे यासाठी उद्योगांनी, शेतकऱ्यांनी व तरुणांनी  मोठे योगदान द्यावे, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

एशियन पेंटस् लि. खंडाळा या कंपनीच्या 2021-22 वर्षाच्या सीएसआर निधीतून आणि जनसेवा चॅरिटेबल सेंटर, पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खंडाळा ग्रामीण रुग्णालयात अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला आहे. याचे लोकार्पण विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या लोकार्पण सोहळ्यास आमदार मकरंद पाटील, आरोग्य सेवा पुणे मंडळाचे  उपसंचालक डॉ. संजोग कदम, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार दशरथ काळे,  खंडाळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा नंदा गायकवाड, एशियन पेंटस्‌चे हरिश लाडे, जयदीप कणसे, व्ही. रवी,अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. सुभाष कदम  आदी उपस्थित होते.

विधान परिषदेचे सभापती श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले, एशियन पेंटस्‌चे आरोग्य व जलसंधारणामध्ये चांगले काम केले आहे. त्यांनी या पुढील काळता पर्यावरण क्षेत्रात काम करावे. शासन विविध योजनांमधून वृक्ष लागवड करीत आहे.  पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे ही काळाची गरज असून   शेतकऱ्यांनीही आपल्या बांधावर जास्तीत जास्त झाडे  लावून पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आमदार श्री. पाटील म्हणाले, संपूर्ण जग गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या विळाख्यात अडकले होते. आज आपल्या देशात संसर्ग कमी झाला आहे. या काळात राज्य शासनाने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला. तसेच जिल्हा प्रशासनानेही चांगल्या पद्धतीने काम केले. खंडाळा ग्रामीण रुग्णालयातील अतिदक्षता विभागात 8 बेड सर्व सोयींयुक्त आहेत. खंडाळा तालुक्यातील इतर कंपन्यांनीही त्यांच्या सीएसआर निधीचा खंडाळा तालुक्याच्या सोयी-सुविधांसाठी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी   केले.

ग्रामीण रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचा खंडाळा तालुक्यातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. या ग्रामीण रुग्णालयाला कधीही औषधांचा साठा कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही आरोग्य सेवा पुणे मंडळाचे  उपसंचालक डॉ. कदम यांनी दिली.

या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, एशियन पेंटस्‌चे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये आसवली ता. खंडाळा येथील सिमेंट बंधाऱ्यांचेही लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!