प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे – पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, पुणे दि. 29 : पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी पूर्णपणे बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांनी प्लाझ्मा (रक्तद्रव) दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी  केले.

पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात प्लाझ्मादाता गौरव कार्यक्रम पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम म्हणाले, कोरोना बाधित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या http://puneplasma.in या वेबसाईटवर किंवा सहायक पोलीस निरीक्षक शिंत्रे मो.नं.9960530329 या  व्हॉटस्अपवर मेसेजव्दारे प्लाझ्मा देऊ इच्छिणाऱ्यांनी नोंद करावी.  पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे यांनी हे चांगले व्यासपीठ तयार केले आहे. बोलणारे भरपूर बोलतात पण आपण सर्व प्लाझ्मादान करणाऱ्यांनी जे काही करुन दाखविले याचा मला आनंद आहे.  पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. ज्यांना ज्यांना प्लाझ्माची गरज आहे त्यांना  ते देण्यासाठीच आपण हा उपक्रम राबवत आहोत. यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, असेही ते म्हणाले.

यावेळी प्लाझ्मा दाते करण रणदिवे, मोहिम नलावडे, राहुल तुपे, वैभव लोढा, अजय मुनोत, राहुल लंगर,जमीर शेख, अवधुत दिवटे, वैभव भाकन, कुणाल तोडी, मोहित तोडी यांना पोलीस आयुक्त डॉ.व्यंकटेशम यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.

पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले, आपण सर्वांनी सगळया शंका-कुशंकांवर मात करुन अनेकवेळा प्लाझ्मा दान केले आहे. तुमची ही कृती फार महत्त्वाची असून एखाद्याचा जीव वाचविणे हे एक मोठे काम आहे. तुमच्या मनात जागृत झालेली ही भावना अशीच पुढे चालू राहून समाजात एक मोठी चळवळ झाली पाहिजे. ही मोहीम शहराबरोबरच ग्रामीण भागातही राबवावी. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, अशी भावना त्यांनी  व्यक्त केली.

यावेळी प्लाझ्मा दाते अजय मुनोत, राहुल लंगर, वैभव भाकन व प्लाझ्मा स्वीकारणारे संदिप सोनवणे यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांचे या उपक्रमाबद्दल आभार मानले.

पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी पुणे शहर पोलीस विभागाने प्लाझ्मा थेरपी हा चांगला उपक्रम हाती घेतला असून पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केलेल्या आवाहनामुळे 405 प्लाझ्मा दात्यांनी प्लाझ्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येक रुग्णाने मदतीचा हात पुढे करुन प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. यामुळे प्लाझ्मा दाता एक मोठी चळवळ होऊ शकेल. उपस्थितांचे सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी आभार मानले.

यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्लाझ्मा दाते व प्लाझ्मा स्वीकारलेल्या रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!