मुंबई बँकेच्या निवडणुकीसाठी दरेकरांचा ‘मजूर’ प्रवर्गातून अर्ज; आता सहकार विभागाने धाडली नोटीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२१ । मुंबई । मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालकपदाच्या निवडणुकीसाठी मजूर प्रवर्गातून अर्ज दाखल करणारे भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संचालकपदाच्या निवडणुकीसाठी तुम्ही मजूर प्रवर्गातून अर्ज दाखल केला. त्यामुळे तुम्ही कुठल्या पद्धतीने मजूर वर्गात मोडता, अशी विचारणा सहकार विभागाने नोटीस पाठवून केली आहे. त्यामुळे आता प्रवीण दरेकर या नोटीसला काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. प्रवीण दरेकर हे सध्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. तसेच ते मुंबई बँकेचे विद्यमान अध्यक्षही आहेत. या सगळ्यातून महिन्याला दरेकर यांना साधारण अडीच लाखांचे मानधन मिळते. त्यामुळे आता प्रवीण दरेकर आपल्या मजूर असण्याचे समर्थन कशाप्रकारे करणार, हे पाहावे लागेल.

गेली अनेक वर्षे दरेकर हे बँकेचे अध्यक्ष असून मजूर या वर्गातूनच ते निवडून येत आहेत. मजूर सहकारी संस्थांच्या उपविधित मजुराची व्याख्या दिलेली आहे. अंगमेहनत करणारी व्यक्ती ही मजूर म्हणून गणली जाते. शारीरिक श्रमातून मजुरी करणारा असला पाहिजे, असेही या उपविधीत नमूद आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर कोणत्या अंगाने मजूर वर्गात मोडतात, हा प्रश्न उपस्थित झाला होता. सहकार सुधार पॅनेलचे अंकुश जाधव, संभाजी भोसले यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे याविषयी आक्षेप नोंदवत याविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना नोटीस पाठवल्याचे समजते.

मुंबई बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड मैदानात उतरले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रसाद लाड यांनी नुकतीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मुंबई बँकेच्या निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली होती. आतापर्यंत प्रवीण दरेकर, आनंदराव गोळे आणि प्रसाद लाड यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे या तिघांची संचालकपदी बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. उर्वरित 18 उमेदवारांचीही बिनविरोध निवड व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.


Back to top button
Don`t copy text!