‘रोज महिलांवरच्या बलात्कार आणि अत्याचारामुळे महाराष्ट्राची बदनामी होते, या मंत्र्यांना झोप कशी लागते’; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.९: भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यात फडणवीसांनी महिलांवरील अत्याचार, मराठा आरक्षण, कृषी कायदे अशा विविध मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरले.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘जनतेला उत्तरदायित्व असलेला भाजप एकमेव पक्ष आहे. कोरोना संकटात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर आहे, एकही घरी बसलेला नाही, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. 15 लाख लोक राज्यात कोरोनाग्रस्त आहेत. राज्यात फक्त एकच धंदा सुरुय तो म्हणजे बदल्यांचा धंदा. प्रेताच्या टाळूवरचे लोणी राज्यकर्ता खात आहेत. या मंत्र्यांना झोप कशी लागते’, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘राज्यकर्त्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. 12 कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. रोज महिलांवरच्या बलात्कार आणि अत्याचारामुळे महाराष्ट्राची बदनामी होतेय. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. कुणी बाहेरून येऊन आमच्या महाराष्ट्राला बदनाम करू शकत नाही. हाथरसच्या घटनेचा निषेध केलाच पाहिजे. मात्र राज्य, जात, समाज, राजकीय व्यवस्था पाहून रस्त्यावर उतरून विरोध म्हणजे बेगडीपणा आहे. राजस्थानमधल्या दलित मुलीबद्दल का नाही केले आंदोलन, का नाही केले ट्वीट? फेब्रुवारीत सात महिलांवर अत्याचार झाले तेव्हा का नाही केले आंदोलन? क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला सुरक्षित नसतील तर कुठे सुरक्षित असणार? आमच्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी हाथरसला जाऊन संवेदना व्यक्त केली. पण तेच मंत्री त्यांच्या बाजूला हिंगणघाटला का नाही गेले? मुख्यमंत्री, गृहमंत्री या तुमच्या मुली नाहीत का?’ असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

‘सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही’

मराठा आरक्षणाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘या सरकारमध्येच समन्वय दिसत नाही. कोणी काही बोलतंय, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठा संताप आहे. केस दाखल केली नाही, म्हणून बेंचसमोर प्रकरण जाऊ शकत नाही आणि स्थगिती उठणार नाही. कधीकधी मला यांच्या मनातच काळंबेरं आहे, असे वाटते. यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही असे दिसत आहे. भाजपने केलेला कायदा वैध नसता तर हायकोर्टात मान्य झालाच कसा? यांच्या नाकर्तेपणाचा ठपका भाजपच्या माथी मारण्याचे काम ते करत आहेत,’ असा आरोप यावेळी फडणवीसांनी केला.

शरद पवारांवर निशाना

यावेळी कृषी विधेयकांवरुन फडणवीसांनी शरद पवारांवर निशाना साधला. फडणवीस म्हणाले की, ‘शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगती’ या त्यांच्या पुस्तकात शेतीमाल कुठेही विकण्यावर बंदी नको. तसेच एपीएमसी मोडीत काढायला हव्या. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे असे मत व्यक्त केले आहे. तसेच शरद पवारांनी कृषी विधेयकाला कुठेच जाहीर विरोध केलेला नाही. त्यांनी फक्त राज्यसभेतील खासदारांच्या निलंबनाची निंदा केली. मात्र वरून ‘मॅडम’चा आदेश आल्यानंतर विरोध करण्यास भाग पडत आहेत. त्यामुळे उद्धवजींनाही त्यावर विरोध करण्यास भाग पाडले. हे सगळे बेगडी आहेत. शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी संघर्षाची वेळ आली तरी करू. काल पर्यटन विभागाने नोटीस काढली आणि बारची वेळ वाढवली. मंदिर नाही पण मदिरालयाची वेळ वाढवलीये. मंदिरात कोरोना होतो, मदिरालयात कोरोना होत नाही. उद्धव साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. देव, देश आणि धर्माची लढाई आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवली पण तुम्ही बदललात उद्धव जी’, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!