सदाबहार व्यक्तीमत्त्व : रमेशचंद्र शेंडे (दादा)

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 02 ऑक्टोबर 2021 । फलटण । रोहित वाकडे आनंदी जगण्याला वयाची मर्यादा नसते. अगदी वयाच्या सत्तरीतही आपण आपल्या आवडी – निवडी जपून आनंदाने एकदम बिनधास्त जगू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे रमेशचंद्र शेंडे (दादा) होय.

शेंडे दादांचा आज 2 ऑक्टोबर रोजी 71 वा वाढदिवस. वडील, अखिल महाराष्ट्र गुरव समाज संस्था, मुंबई व शैव समाज सहाय्य्यक मंडळ, मुंबई चे संस्थापक, लोकसंग्राहक कै. अनंतराव रामचंद्र शेंडे यांच्याप्रमाणेच दादांना सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच राजकारणाची विशेष आवड. फलटण तालुका गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष, कै.अनंतराव शेंडे फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, नवदूर्ग गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदी पदांवरुन दादा आजही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

थोर स्वातंत्र्यसेनानी कै.किसन वीर आबा, माजी मंत्री कै.विलासकाका पाटील उंडाळकर, माजी खासदार कै.लक्ष्मणराव पाटील, विद्यमान आमदार मकरंदआबा पाटील अशा राजकीय व्यक्तीमत्त्वांशी शेंडे दादांचा अत्यंत निकटचा आणि जिव्हाळ्याचा संबंध. शिवाय, सुरुवातीची ऐन उमेदीची अनेक वर्षे वडिलांबरोबर मुंबईत व्यतीत झाल्यामुळे दादांची जडणघडणही उत्तम झाली. सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या शेंडे दादांचा वावर अशा अनेक मोठ्या व्यक्तींसोबत राहिला असल्याने आजही एखाद्या सामाजिक प्रश्‍नावर, राजकीय मुद्यावर आपले स्पष्ट आणि सर्वांना पटेल असे परखड मत दादा लगेच मांडत असतात.

राहणीमान अत्यंत टापटीप, पर्यावरण पूरक इलेक्ट्रीक बाईक वरुन याही वयात रोजचा फेरफटका, मित्रमंडळींशी सततचा संपर्क, आधुनिक मोबाईल तंत्रज्ञान, संगीत, चित्रपट, पर्यटन याबाबतचे विशेष आकर्षण, इतकेच नाही तर हे सगळे छंद जपताना धार्मिक कार्यातही सक्रीय यातूनच दादांचे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व अधोरेखित होते. शिवाय बोलक्या आणि विनोदी स्वभावामुळे त्यांना भेटणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्यापेक्षा वयाने मोठी असो वा लहान; दादांशी त्याची मैत्री होणारच हे ही दादांचे स्वभाववैशिष्ठ्य आवर्जून उल्लेखनीय असेच आहे.

अशा या सदाबहार व्यक्तीमत्त्व लाभलेल्या आमच्या आदरणीय शेंडे दादांना पुढील आयुष्यही असेच मनसोक्त जगण्यासाठी उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना ! दादांना आजच्या वाढदिवसानिमित्त ‘लोकजागर’ परिवाराच्यावतीने खूप सार्‍या शुभेच्छा !

– रोहित वाकडे,
संपादक, साप्ताहिक लोकजागर, फलटण.


Back to top button
Don`t copy text!