
दैनिक स्थैर्य | दि. १३ ऑगस्ट २०२३ | बारामती |
चित्रपटातील हिरो व राजकारणातील पुढारी यांना आदर्श मानण्यापेक्षा ‘एव्हरेस्ट वीर’ लहू उघडे व त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना आदर्श माना, ते खरे रियल हिरो आहेत. युवकांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात योगदान द्या, देशाला, समाजाला पुढे नेणार्या विचारांचे ध्येय समोर ठेवा, असे आव्हान शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी केले.
शनिवार, दि. १२ ऑगस्ट रोजी बारामती ट्रेकर्स क्लबच्या वतीने परिसरातील प्रवासाची आवड असणार्या, भटकंती करणारे, फिरस्ते, ट्रेकर्स, निसर्ग गडकिल्ले संवर्धन करणार्या संस्था आदींचा सत्कार व ‘एव्हरेस्ट वीर’ लहू उघडे यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी शर्मिला पवार बोलत होत्या.
यावेळी ‘एवरेस्ट वीर’ लहू उघडे, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जय पाटील व ट्रेकर्स क्लबचे अध्यक्ष अॅड. सचिन वाघ व सदस्य आणि श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळलो व छत्रपतींच्या विचारांची शिदोरी यामुळे जगातील सर्वात उंच ‘एवरेस्ट’ शिखरावर चढून तिरंगा व भगवा फडकवू शकलो व ‘एव्हरेस्ट वीर’ होऊ शकलो.
सिंहगडावर ताक, लिंबू, पाणी विकत व्यवसाय करत असताना राज्यातील बहुतांश गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग केले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. त्यानंतर एव्हरेस्ट सर करण्याची महत्वाकांक्षा बळावली. त्यासाठी तंत्रशुद्ध शिक्षण घेतले, सराव केला. आर्थिक परिस्थिती नसतानासुद्धा वर्गणी, मदत गोळा करून काठमांडू गाठले व निसर्गाचा लहरीपणा, क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण, सहकारी गिर्यारोहक यांचा मृत्यू व इतरांची जखमी अवस्था व श्वास घेण्यास त्रास होत होता, धीर खचत होता; परंतु सह्याद्री व छत्रपतींच्या विचाराने मृत्यू दिसत असतानासुद्धा एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा आणखीन प्रबळ झाली व एव्हरेस्ट सर केले आणि छत्रपतींची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केली. परतीचा कठीण प्रवाससुद्धा जिंकला. सामान्य घरातला तरुण केवळ छत्रपतींच्या विचारामुळे ‘एव्हरेस्ट वीर’ होऊ शकला, हे सार्या जगाने पाहिले असल्याचे लहू उघडे यांनी सांगितले. यावेळी एव्हरेस्टवरील चढाईची चित्रफीत दाखविण्यात आली.
प्रवास करताना गडकिल्ले यांचे संवर्धन व्हावे, गडकिल्ल्यांचा इतिहास बाल व तरुणांना समजावा, मनाचे उत्तम आरोग्य, धैर्य धाडस या गोष्टी ट्रेकिंगच्या माध्यमातून सर्वांना मिळतात. म्हणून विविध किल्ल्यांवर परिक्रमा, सायकल, बाईक प्रवास करीत या क्षेत्रातील सर्वांना व्यासपीठ निर्माण करून देत असल्याचे बारामती ट्रेकर्स क्लबचे अध्यक्ष अॅड. सचिन वाघ यांनी सांगितले.
सायकलिंग, पर्यावरण, खेळ, निसर्ग जागर, ट्रेकिंग, सोलो ट्रॅव्हल्स व महिलांसाठी ट्रॅव्हलिंग, रेस्क्यू टीम इ. क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या संस्था, व्यक्ती यांचा व लहू उघडे यासाठी काम करणार्या मित्रपरिवाराचा सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन अनिल सावळे-पाटील यांनी केले.