दैनिक स्थैर्य । दि. २६ जून २०२३ । भद्रावती । आपण अर्ध्या रात्रीही जनसामान्यांच्या समस्या, प्रश्न घेऊन आलात तरी त्या सोडविण्यासाठी आमचे दार खुले आहे, असे सांगून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक वैश्विक नेते आहेत. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी भारताला अतिउच्च शिखरावर नेऊन पोहोचविले. पंतप्रधानांच्या भारतीय जनता पक्षात आज जनसामान्यांतील तडफदार नेते इंजि. रमेश राजूरकर यांनी हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. आपण जनसामान्यांच्या समस्या कधीही घेऊन या, त्या सोडविण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार, असे आश्वासन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
रमेश राजूरकर यांचा प्रक्षप्रवेश सोहळा तथा लाभार्थी संमेलन स्थानिक जैन मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर, वणी येथील आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, आमदार बंटी भांगडिया, माजी आमदार आशिष देशमुख, ज्येष्ठ भाजप नेते बळवंत गुंडावार, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, करण देवतळे, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, बाबा भागडे, चंद्रपूर जिल्हा तथा भद्रावती-वरोरा तालुका व शहर भाजपचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी भ्रमणध्वनीद्वारे पंतप्रधान मोदी यांना संदेश पाठविण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
काँग्रेस, शिवसेना, मनसे व अन्य पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी भाजप तसेच भाजपच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश घेतला. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी मार्गदर्शनामध्ये भाजप सर्वसामान्यांचा पक्ष असल्याचे सांगून या पक्षात येणाऱ्या रमेश राजूरकर यांचे स्वागत करत असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. प्रास्ताविकामध्ये रमेश राजूरकर यांनी भाजपमध्ये जाण्याबाबत आपली बाजू स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत खुळे व माधव बांगडे यांनी केले.
परीक्षेत संपूर्ण मार्कांसह चांगले गुण घेऊ : राजुरकर
पुढील काळामध्ये जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण वेळ काम करणार आहोत. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आता राज्यात सत्ता असलेला पक्ष आपल्या सोबत आहे. त्यामुळे सामान्यांना काळजी करण्याची गरज नाही. आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहो. एवढेच नाही, तर पुढे येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत संपूर्ण मार्कांसह चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होऊ, असा आत्मविश्वास राजूरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केला.
मोटारसायकल रॅलीने भव्य स्वागत
कार्यक्रमापूर्वी पाहुण्यांचे स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार येथे भव्य स्वागत करून, मोटारसायकल रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रसंगी भद्रावती भाजप तालुका तथा शहरप्रमुख, भारतीय जनता युवामोर्चा शहर व ग्रामीणचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, भाजप महिला पदाधिकारी, शहरी व ग्रामीण महिला आघाडी संघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.