दैनिक स्थैर्य । दि. ०८ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रामधून होणाऱ्या प्रदूषणाविषयी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेऊन हे प्रदूषण कमी करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निर्देश दिले. मंडळामार्फत यासंदर्भात अंमलबजावणी करण्यात आली असून पाणीयुक्त राख नांदगांव तलावात टाकण्यास निर्बंध घातल्याने या परिसरातील प्रदूषणाची तीव्रता कमी झाली आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.
पर्यावरण संरक्षण व आर्थिक विकास एकत्रितपणे होणे आवश्यक आहे. शाश्वत विकास तसेच भविष्यातील स्वच्छ व अक्षय उर्जेबाबत शासन आग्रही आहे. या उपाययोजना राज्यभरातील अशाच अन्य प्रकल्पांसाठीही केल्या जातील, असे श्री.ठाकरे यांनी म्हटले आहे.
खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण होणारी राख नांदगांव येथील राखेच्या तलावात टाकण्यात येत असल्याने नांदगांव परिसरात जल व वायू प्रदूषणाची समस्या निर्माण झाल्याबाबत तक्रारी येत होत्या. या अनुषंगाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाजेनको, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची 6 आणि 18 जानेवारी रोजी संयुक्त आढावा बैठक घेतली. या बैठकीत श्री.ठाकरे यांनी नांदगांव ॲश पाँडमध्ये पाणीयुक्त राख टाकण्यात येत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाला तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राला नांदगांव तलावात राख टाकणे तात्काळ बंद करण्याबाबत 1 फेब्रुवारी रोजी निर्देश बजावण्यात आले. या निर्देशांचे अनुपालन झाल्याबाबत महाजेनको, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राने 4 फेब्रुवारी रोजी कळविले असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.