
स्थैर्य, फलटण, दि. 27 डिसेंबर : निवडणुकीचा निकाल लागला की, विजयी उमेदवार गुलाल उधळतात आणि नंतर पाच वर्षे मतदारांना शोधूनही सापडत नाहीत, असा सर्वसामान्य अनुभव असतो. मात्र, फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ च्या नवनिर्वाचित नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी हा समज खोडून काढत एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. विजयानंतर लगेचच त्यांनी प्रभागात ‘आभार दौरा’ सुरू केला असून, त्या स्वतः घरोघरी जाऊन पेढे भरवत आणि आभार पत्र देत मतदारांचे ऋण व्यक्त करत आहेत.
वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी नगरसेविका होण्याचा बहुमान मिळवलेल्या सिद्धाली शहा यांनी विजयानंतर दाखवलेली ही राजकीय प्रगल्भता (Political Maturity) सध्या फलटणमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. प्रभागातील प्रत्येक घरी जाऊन त्या केवळ आभार मानत नाहीत, तर नागरिकांच्या हातात एक विशेष ‘आभार पत्र’ देत आहेत. या पत्रात त्यांनी स्वतःचा वैयक्तिक मोबाईल नंबर दिला असून, प्रभागातील समस्यांच्या निवारणासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष ‘व्हॉट्सॲप ग्रुप’ची माहितीही दिली आहे.
“तुम्ही मला भरघोस मतांनी निवडून दिले, आता तुमची कामे करणे ही माझी जबाबदारी आहे. कोणत्याही कामासाठी तुम्ही मला थेट या नंबरवर संपर्क साधा,” असा विश्वास त्या नागरिकांना देत आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सिद्धाली शहा यांच्या या कृतीचे मोठे अप्रूप वाटत आहे. “निवडून आल्यावर पुन्हा दारात येऊन पेढा भरवणारी आणि स्वतःहून फोन नंबर देणारी ही पहिलीच लोकप्रतिनिधी पाहायला मिळत आहे,” अशा शब्दांत नागरिक त्यांचे कौतुक करत आहेत.
प्रभाग क्रमांक ८ मधील एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले की, “आजवर अनेक निवडणुका पाहिल्या, पण विजयानंतर इतक्या नम्रपणे आणि तत्परतेने नागरिकांशी संवाद साधणारी सिद्धाली ही पहिलीच उमेदवार आहे. वयाच्या २१ व्या वर्षी तिच्याकडे असलेली ही समज आणि कामाची तळमळ पाहून आम्हाला अभिमान वाटतो.”
माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी घालून दिलेल्या जनसंपर्काच्या पाऊलावर पाऊल टाकत सिद्धाली यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही सुरू केला आहे. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून प्रभागातील समस्या आणि सूचनांचे संकलन करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचा त्यांचा मानस आहे.
एकीकडे राजकीय जल्लोष सुरू असताना, दुसरीकडे जमिनीवर पाय ठेवून मतदारांशी नाळ जोडणाऱ्या सिद्धाली अनुप शहा यांच्या या ‘आभार दौऱ्या’ने विरोधकांनाही विचार करायला लावले आहे. फलटणच्या राजकारणात तरुण रक्ताची ही नवीन आणि सकारात्मक कार्यपद्धती निश्चितच स्वागतार्ह ठरत आहे.

