आयुष्यानंतरही सर्वश्रेष्ठ दान, अवयवदानाचा बाळगा अभिमान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून राज्यभरात ७ एप्रिलपासून अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त अवयवदानाची गरज विशद करणारा लेख..

जगातील पहिले मानवी अवयव प्रत्यारोपण १९५४ मध्ये झाले, तर भारतात १९७१ मध्ये सीएमसी वेल्लोर येथे करण्यात आले. दुर्दैवाने ५० वर्षांनंतरही भारतात अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. आज आपल्याकडे जे काही अवयव प्रत्यारोपण होत आहे, त्यात बहुसंख्य थेट संबंधित दात्यांकडून आहेत, तर ब्रेनडेड रुग्णांचे कॅडेव्हरिक अवयवदान नेहमीच मागे राहिले आहे. या उदात्त आणि मानवी कारणासाठी पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात दहा हजारांपैकी केवळ एक रुग्ण अवयवदानासाठी संमती देतो, तर पाश्चिमात्य देशांत १० हजार लोकसंख्येपैकी सुमारे ३५०० लोकांमध्ये अवयवदानासाठी संमती मिळते.

सध्या भारतात सुमारे ५७० अवयव प्रत्यारोपण केंद्रे असून केवळ १४० नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर्स आहेत, जी लोकसंख्येच्या सध्याच्या गरजेनुसार खूपच कमी आहेत. दुसरे म्हणजे यातील बहुसंख्य खाजगी संस्था आहेत, जिथे उपचारांचा खर्च सर्वांना परवडणारा नाही.

सध्या भारतात शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांच्या उपचारांसाठी २ लाख मूत्रपिंड आणि १ लाख यकृताची गरज आहे. मात्र दरवर्षी केवळ ४००० मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि ५०० यकृत प्रत्यारोपण केले जात असून, हजारो रुग्ण नवीन आयुष्य जगण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत अवयवांअभावी मृत्युमुखी पडत आहेत. हृदयाची परिस्थिती आणखी बिकट असून, पाच हजार रुग्णांना हृदयाची गरज असून केवळ २० ते ३० हृदय प्रत्यारोपण केले जात आहे. जेव्हा लोकसंख्येने हे पारंपरिक प्रत्यारोपण स्वीकारले नाही, तेव्हा हात प्रत्यारोपणासारख्या नवीन पद्धतींचा विचार करणे खूप कठीण आहे.

रस्ते अपघातात दरवर्षी सुमारे दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात, त्यापैकी अनेक जण उपचारादरम्यान ब्रेनडेड होतात. एक ब्रेनडेड रुग्ण २ मूत्रपिंड, १ यकृत, १ हृदय, २ फुफ्फुस, १ स्वादुपिंड यांचा संभाव्य दाता असून एकाच वेळी ७ जीव वाचवू शकतो. तसेच कॉर्निया, त्वचा, हाडे यासारख्या ऊतींचे दान करू शकतो आणि अपंग रुग्णांना विविध अपंगत्वापासून मुक्त होण्यास मदत करू शकतो.

राज्यातील ११ कोटी २३ लाख लोकसंख्येतून केवळ ४९ हजार अवयवदानाची शपथ घेऊन महाराष्ट्र भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी केवळ ७२ केंद्रे, यकृत प्रत्यारोपणासाठी ३६ केंद्रे आणि हृदय प्रत्यारोपणासाठी ९ केंद्रे असून इतर प्रत्यारोपणासाठी फारच कमी केंद्रे आहेत. राज्यात नेत्र व त्वचा बँका आणि नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटरही फारच कमी आहेत.

महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि त्याचा अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून अवयव दान जनजागृती अभियान नक्कीच मदतीचे ठरेल. यातून प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिकाला अवयवदानाच्या कार्यपद्धतीची चांगली माहिती होईल आणि त्यांचे सर्व गैरसमज समाधानकारक आणि वैज्ञानिकदृष्ट्या दूर होतील, अशी अपेक्षा आहे.

सध्याच्या मिशनच्या माध्यमातून अवयवदानासाठी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात अवयवदात्यांची संभाव्य यादी वाढविणे हे अभियानाचे उद्दिष्ट आहे. तसेच नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन सेंटरची संख्या वाढवून गरीब व गरजू रुग्णांसाठी शासकीय संस्थांमध्ये परवडणाऱ्या प्रत्यारोपण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक शासकीय संस्थेत अवयवदान जनजागृती अधिकारी यंत्रणा समाविष्ट करून विद्यमान रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याचे नियोजन आहे. आधीच उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांमध्ये समावेश करून तसेच त्यासाठी आर्थिक देणगीदारांचा पूल तयार करून प्रत्यारोपणाच्या आर्थिक ओझ्यावर मात करण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून उपाय शोधले जात आहोत.

  • संकलन – अविनाश गरगडे, जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर

Back to top button
Don`t copy text!